जाच करणाऱ्या संस्था सचिवाच्या अटकेनंतरच शिक्षकाचा मृतदेह घेतला नातेवाइकांनी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:38 IST2025-04-18T18:36:59+5:302025-04-18T18:38:08+5:30

शिक्षकावर शुक्रवारी दूपारी झाले आडगाव दराडे गावामध्ये अंत्यसंस्कार

Relatives took possession of the teacher's body only after the arrest of the institute secretary | जाच करणाऱ्या संस्था सचिवाच्या अटकेनंतरच शिक्षकाचा मृतदेह घेतला नातेवाइकांनी ताब्यात

जाच करणाऱ्या संस्था सचिवाच्या अटकेनंतरच शिक्षकाचा मृतदेह घेतला नातेवाइकांनी ताब्यात

परभणी : संस्था सचिवाच्या जाचाला कंटाळून प्राथमिक शिक्षकाने आत्महत्या केल्याच्या घटनेत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी दुपारी गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपी संस्था सचिवास त्वरित अटक करावी, या मागणीसाठी कुटूंब, शिक्षक तसेच संघटना यांनी गुरुवारी रात्री मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. अखेर गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपी संस्था सचिवाला अटक केली. यानंतर जिल्हा रुग्णालयातील प्रक्रीया पूर्ण करुन शुक्रवारी दूपारी हा मृतदेह पालवे यांच्या कुटूंबाने ताब्यात घेत सेलू तालुक्यातील आडगाव दराडे या गावी नेला. दूपारी ४ च्या सूमारास मयत शिक्षकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बळवंत खळीकर (६७) असे यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी संस्था सचिवाचे नाव आहे. सोपान पालवे या प्राथमिक शिक्षकाने गुरुवारी सकाळी पाथरी रोड परिसरातील शेत शिवारात आत्महत्या केली होती. याप्रकरणी मयताची पत्नी सागर पालवे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात संस्था सचिव बळवंत खळीकर यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी संस्था सचिव बळवंत खळीकर यास गुरुवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. सोपान पालवे यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगी,दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेने आडगा दराडे गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी तसेच शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे येथे अटकेबाबत आणि तपासासाठी निवेदने देण्यात आली.

आरोपीवर दवाखान्यात उपचार
संस्था सचिव तथा आरोपी बळवंत खळीकर यास ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्येतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे संरक्षण देण्यात आल्याचेही समजते. ग्रामीण पोलिसांनी १२ तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतल्याची कारवाई केली.

Web Title: Relatives took possession of the teacher's body only after the arrest of the institute secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.