महिनाभरात ३ कोटी ४७ लाखांची वीज बिल वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:59+5:302021-04-05T04:15:59+5:30
गंगाखेड शहरासह तालुक्यातील वीज ग्राहकांना विभाग कार्यालयाच्या वतीने वीज पुरवठा करण्यात येतो. वीज ग्राहकांना आलेल्या अडचणींची साेडवणूकही महावितरण कंपनीकडून ...

महिनाभरात ३ कोटी ४७ लाखांची वीज बिल वसुली
गंगाखेड शहरासह तालुक्यातील वीज ग्राहकांना विभाग कार्यालयाच्या वतीने वीज पुरवठा करण्यात येतो. वीज ग्राहकांना आलेल्या अडचणींची साेडवणूकही महावितरण कंपनीकडून केली जाते. वीज पुरवठा केल्यानंतर दर महिन्याला घरगुती, कृषी, वाणिज्य, औद्योगिक वीज ग्राहकांना बिल देण्यात येते. मात्र, सततचे लॉकडाऊन, नैसर्गिक संकटे त्यामुळे बहुतांश ग्राहकांनी आपल्याकडील वीज वितरण कंपनीची बिले अदा केली नाहीत. परिणामी, तालुक्यात थकबाकीचा डोंगर वाढत गेला. त्यानंतर मार्च महिन्यात गंगाखेड येथील वीज वितरण कपंनीच्या वतीने थकीत वीज बिल वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील थकबाकीदारांकडून बिलांची वसुली या मोहिमेत करण्यात आली. यामध्ये कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडून ४१ लाख ९१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच शहर व तालुक्यातील घरगुती वीज ग्राहकांकडून ३ कोटी १५ लाख २० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. त्यामुळे मार्च महिन्यात ९ हजार ८३२ वीज ग्राहकांकडून ३ कोटी ५७ लाख २० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीला काही अंशी दिलासा मिळाला आहे.
वीज चोरणाऱ्यांवर केली कारवाई
गंगाखेड तालुक्यात घरगुती वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुली करण्यात आली. मात्र, ज्या ग्राहकांनी आकडे टाकून वीज पुरवठा घेतला होता. अशा वीज ग्राहकांना पकडून त्यांच्यावर महावितरण कंपनीकडून दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणने राबविलेल्या विशेष वीज बिल वसुली मोहिमेला संचारबंदीतही यश आल्याचे दिसून आले. ज्या ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे. त्या ग्राहकांनी तात्काळ थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीने थकबाकीदार असलेल्या अनेक वीज ग्राहकांचे वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.