नागरी समस्येवर वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको आंदोलन
By मारोती जुंबडे | Updated: September 27, 2022 18:05 IST2022-09-27T18:05:25+5:302022-09-27T18:05:57+5:30
परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नागरी समस्येवर वंचित बहुजन आघाडीकडून रास्तारोको आंदोलन
परभणी : शहरातील वार्ड क्रमांक १० मधील नाले व रस्त्यांची दुरुस्ती करावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी विसावा कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परभणी शहरातील वार्ड क्रमांक १० मधील शाहूनगर नगरातील रस्त्यांचे मोजमाप करून दोन्ही बाजूने नाल्या उभारण्यात याव्यात, नवीन लाइट मीटर देण्यात यावे, त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेनगर येथे एनओसी द्यावी, लक्ष्मीनगरातील दोन्ही बाजूने नाली काढून रस्त्याची दुरुस्ती करावी, नेहरू नगरातील रस्त्याचे काम तत्काळ करावे, भारत नगरात भाैतिक सुविधांचा वानवा असल्याने गैरसोय होत आहे. यासह आधी मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मंगळवारी परभणी शहरातील विसावा कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मनपा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर नागेराव पांचाळ, सुरेश शेळके, डॉ. धर्मराज चव्हाण, अलमगीर खान, टी.डी. रुमाले, सचिन गंगाखेडकर, सुमित भालेराव, सुनीताताई साळवे, प्रमोद कुटे, तुषार गायकवाड, सर्जेराव पंडित, अमोल ढाकणे, भगवान दराडे, सतीश वाकडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.