मालवाहतूकीमुळे रापमची एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:37+5:302021-05-29T04:14:37+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागत ...

मालवाहतूकीमुळे रापमची एसटी मालामाल; चालक मात्र कंगाल
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०पासून वारंवार संचारबंदी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. यावर उपाय म्हणून एसटीने प्रवासी वाहतुकीबरोबरच व्यावसायिक माल वाहतुकीलाही सुरुवात केली आहे. सध्या परभणी विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाऱ्या ७ आगारांमध्ये २५ मालवाहतूक बस आहेत. या मालवाहतूक बसमधून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढीस हातभार लागत आहे. २२ मार्च २०२० ते २७ मे २०२१ या कालावधीत २५ बसेसच्या माध्यमातून १ हजार ८६२ बसफेऱ्या सोडण्यात आल्या. त्यासाठी २ लाख २९ हजार २४४ किमीचे अंतर कापण्यात आले आहे. यातून एसटी महामंडळाला ९३ लाख ७० हजार ८१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, मालवाहतूक बस घेऊन जाणाऱ्या चालकांना परजिल्ह्यामध्ये दोन ते तीन दिवस मुक्काम करावा लागतो. त्यासाठी एसटी महामंडळाकडून कोणतीही सुविधा पुरवण्यात आलेली नाही. उलट स्वखर्चातून दोन ते तीन दिवसांची बस चालकाला गुजराण करावी लागते. त्यामुळे एकीकडे संचारबंदीच्या काळात माल वाहतुकीतून एसटी मालामाल होत असली तरी चालक मात्र कंगाल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देऊन चालकांना मोफत राहण्याची व खाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
कोरोना काळात ९४ लाख रुपयांची कमाई
मागील वर्षभरापासून परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सातही आगारांतील प्रवासी वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे एसटी महामंडळ मालवाहतूक बसमधून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षभराच्या कालावधीत १ हजार ८६२ फेऱ्या मालवाहतूक बसने पूर्ण केल्या आहेत. त्यामधून २ लाख २९ हजार २०६ किमीचे अंतर पार केले आहे. यातून प्रतिकिमी ४०.८७ प्रमाणे ९३ लाख ७० हजार ८१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसने संचार बंदीच्या काळात वर्षभरात ९४ लाख रुपयांची कमाई केली आहे.
परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम
सध्या मध्यवर्ती कार्यालयाप्रमाणे जिल्हास्तरावर मालवाहतुकीसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्याच्यावर जिल्ह्यातील मालवाहतुकीची जबाबदारी सोपविली आहे. यामध्ये कृषी, अन्न प्रक्रिया केलेल्या मालासह अन्य महामंडळांच्या गोदामातील मालाची वाहतूक प्राधान्याने करण्यात येते. सध्या बाजारामध्ये असलेल्या मालवाहतुकीच्या दराप्रमाणे एसटी आपले दर आकारत आहे. या मालवाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही दिवसांपासून ही मालवाहतूक चालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. परजिल्ह्यातून माल घेऊन गेलेली गाडी पाच ते सहा दिवस परत येत नाही. त्या ठिकाणावरून लवकर माल मिळत नसल्याने अडचण निर्माण होत निर्माण होत आहे. त्यामुळे चालकांनाही परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत संबंधित आगारात मुक्काम ठोकावा लागतो. त्यासाठी लागणारा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे.
ॲडव्हान्स मिळतो. मात्र, पगारातून होतो कट
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयअंतर्गत येणाऱ्या ७ आगारांमधून मालवाहतूक केली जाते. तसेच इतर जिल्ह्यात गेल्यानंतर परतीचा मालवाहतूक मिळेपर्यंत संबंधित चालकाला त्या ठिकाणी थांबावे लागते. त्यासाठी एसटी महामंडळाकडून ५०० च्या पटीत ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, ॲडव्हान्सची रक्कम आगामी पगारामधून कपात केली जाते. त्यामुळे संचारबंदीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या चालकांना एसटी महामंडळाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे.