सेलूत संचारबंदीच्या विरोधात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:19+5:302021-04-02T04:17:19+5:30
सेलू : जिल्हाधिकाऱ्यांनी वाढ केेलेल्या संचारबंदीच्या विरोधात सेलू येथे गुरुवारी भीमप्रहार युथ फोरम व काही व्यापाऱ्यांनी शहरातून रॅली काढून ...

सेलूत संचारबंदीच्या विरोधात रॅली
सेलू : जिल्हाधिकाऱ्यांनी वाढ केेलेल्या संचारबंदीच्या विरोधात सेलू येथे गुरुवारी भीमप्रहार युथ फोरम व काही व्यापाऱ्यांनी शहरातून रॅली काढून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्च रोजी सायंकाळी ७ पासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता हीसंचारबंदी संपणार होती. तत्पूर्वीच ३१ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून संचारबंदीला ५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाच्या विरोधात भीम प्रहार युथ फोरमच्या वतीने गुरुवारी लॉकडाऊन तोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी सकाळी ९.३०च्या सुमारास शहरातील आठवडी बाजार भागातून तहसील कार्यालयावर रॅली काढण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देवून लॉकडाऊन हटवावे, अशी मागणी करण्यात आली. गतवर्षीपासून लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. किरकोळ व्यावसायिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. हातावरचे पोट असलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यावर लावण्यात आलेले लॉकडाऊन परवडणारे नाही. व्यावसायिकांचे दुकान भाडे, विजेचे बिल, नोकराचा पगार आदी द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे, अशीही व्यथा यावेळी मांडण्यात आली. यावेळी हेमंत आडळकर, ॲड. विष्णू ढोले, रघुनाथ बागल, छगन शेरे, शेख रहीम, अय्युब शेख, अजीम कादरी, इसाक पटेल, शेख राज, साजीद शेख, गणेश निवळकर, दिलावर शेख, अमजद बागवान आदी उपस्थित होते.
दुकाने उघडण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर सेलू येथील व्यापाऱ्यांनी यापूर्वीही आंदोलन केले होते. गुरुवारीही भीम प्रहार युथ फोरमच्या लॉकडाऊन तोडे, दुकाने उघडा या आवाहनाला प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी या संदर्भातील चित्रीकरण सुरू करताच दुकाने उघडण्यात आली नाहीत.
दुकाने उघडण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न