राजेश...तू कोणाच्या तरी दबावात आहेस; सर्वांसमोरच सुरेश धसांकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:30 IST2025-01-04T16:28:30+5:302025-01-04T16:30:27+5:30

राजेश विटेकर...तू विमा घोटाळा करणाऱ्यांचं कसं काय नाव घेत नाही, असं म्हणत सुरेश धस यांनी विटेकर यांना कोंडीत पकडलं आहे.

Rajesh vitekar you are under pressure from someone bjp Suresh Dhas alligation on ncp mla | राजेश...तू कोणाच्या तरी दबावात आहेस; सर्वांसमोरच सुरेश धसांकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला खडेबोल

राजेश...तू कोणाच्या तरी दबावात आहेस; सर्वांसमोरच सुरेश धसांकडून राष्ट्रवादीच्या आमदाराला खडेबोल

BJP Suresh Dhas: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज परभणी जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून हा मूक मोर्चा निघाला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच परभणीतील सोनपेठचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनाही मंचावरूनच खडेबोल सुनावले.

धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना राज्यात मोठ्या प्रमाणात पीक विम्याचा घोटाळा झाल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे. याविषयी बोलताना आमदार धस म्हणाले की, "आमदार राजेश विटेकर तुमच्या एकट्या सोनपेठ तालुक्यातील १३ हजार हेक्टर क्षेत्रावर परळीतील लोकांनी पीक विमा भरला आहे. बंजारा समाजाचे बांधव ऊसतोडीसाठी बाहेरच्या राज्यात जातात, याचा फायदा घेऊन परळीतील अनेकांनी सोनपेठ तालुक्यातील बंजारा समाजाच्या जमिनीवर पीक विमा भरला. भरला की नाही राजेश विटेकर? मग तुम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही? याचा अर्थ राजेश तू कोणाच्या तरी दबावाखाली आहेस. अरे रगेल वागायचं रगेल. आयुष्यभर शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ बनून जगायचं. राजेश विटेकर...तू विमा घोटाळा करणाऱ्यांचं कसं काय नाव घेत नाही. मी वाट बघत होतो की, राजेश विटेकर पीक विमा घोटाळ्यावर पत्रकार परिषद घेतोय की नाही? पण अजून नाही घेतली," असं म्हणत सुरेश धस यांनी आमदार राजेश विटेकर यांना आपल्या खास शैलीत कोंडीत पकडलं.

दरम्यान, परभणीतील निषेध मोर्चा महाराणा प्रताप चौक, शनि मंदिर, नानलपेठ कॉर्नर, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दाखल झाला होता. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राजेश विटेकर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

Web Title: Rajesh vitekar you are under pressure from someone bjp Suresh Dhas alligation on ncp mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.