चक्क तीस लाख रुपयांच्या रेल्वे रूळाची चोरी; मुख्य आरोपी निघाला रेल्वेतीलच अभियंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:37 IST2025-03-03T19:37:47+5:302025-03-03T19:37:59+5:30
रेल्वे रूळ चोरी प्रकरणात तपासासाठी तीन पथके स्थापन; एक आरोपी ताब्यात

चक्क तीस लाख रुपयांच्या रेल्वे रूळाची चोरी; मुख्य आरोपी निघाला रेल्वेतीलच अभियंता
परभणी : गंगाखेड स्थानकाजवळील वडगाव निळा येथील तीस लाख रुपयांच्या रेल्वे रूळ चोरीप्रकरणी परभणी आरपीएफ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात या चोरीच्या तपासासाठी तीन पथके तैनात केली आहेत.
२३ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या या प्रकरणात एका आरोपीला २१ फेब्रुवारीला आरपीएफ पथकाने ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी अभियंता हैदराबादमध्ये उपचार घेत असून त्याचा ताबा मिळविण्याचे प्रयत्न आरपीएफ पोलिसांचे सुरू आहेत. यामुळे अजून फरार चार ते पाच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागात विविध स्थानकांच्या दरम्यान जुने रेल्वे रूळ बदलून तेथे नवीन रूळ टाकण्याचे काम मागील काही महिन्यांत सुरू आहे. याच दरम्यान वडगाव निळा स्थानकाजवळ स्टॉकमध्ये ठेवलेले रेल्वे रूळ गायब झाल्याचे प्रकरण घडले. यामध्ये परभणी आरपीएफ ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आरपीएफ पोलिसांकडून परभणी, परळी, जालना, नांदेड अशा ठिकाणी चौकशी करून तपास सुरू होता. यामध्ये रेल्वेतील अधिकाऱ्याचा समावेश असल्याची कुणकुण लागली होती. त्यानुसार पोलिसांनी हा तपास सुरू केला. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस. बी. कांबळे, नांदेड सीआयडी यासह विशेष पथक तपासासाठी निश्चित केले आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारीला गंगाखेडला शेख रशीद यास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. हायड्रा व साहित्य पुरवठा करणाऱ्या शेख रशीद याच्या माध्यमातून पुढील तपास पोलिसांनी केला. आता चार ते पाच आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी ही पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
आरोपी रेल्वे अभियंता
पूर्णा सेक्शनअंतर्गत रेल्वेच्या परभणी, परळी मार्गावरील रेल्वे अभियंता म्हणून जबाबदारी असलेल्या एम. सतीश बाबू याचाही यात आरोपी म्हणून समावेश असल्याचे आरपीएफ पोलिस निरीक्षक एस. बी. कांबळे यांनी सांगितले. एम. सतीश बाबू हा हैदराबादला रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहे. या संदर्भात आरपीएफने सदरील रुग्णालयातसुद्धा कर्मचारी तैनात करून रेल्वेच्या डॉक्टरांसह अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यामुळे सतीश बाबू याला ताब्यात घेतल्यावर पुढील तपास करणे सोपे होणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले.