पाथरीत राडा! माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:39 IST2025-03-12T17:38:38+5:302025-03-12T17:39:26+5:30

या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दुर्राणी यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rada in Pathri! Former MLA Babajani Durrani assaults Shinde Sena's Alok Choudhari in Municipal Council area | पाथरीत राडा! माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

पाथरीत राडा! माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण

पाथरी : साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूमी अधिग्रहण संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीमध्ये येथील नगरपरिषद सभागृहामध्ये बैठक पार पडली. मात्र, बैठकीमधील वादाची ठिणगी सभागृह बाहेर दिसून आली. ऐनवेळी नगरपरिषदमध्ये समर्थकांसह दाखल झालेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेचे पदाधिकारी अलोक चौधरी यांना मारहाण केली. घटनेनंतर पळापळ होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात दुर्राणी यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरी येथे मागील काही महिन्यापासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा राजकीय संघर्ष पेटलेला गेला आहे. विधानसभा निवडणुकी नंतर हा संघर्ष अधिक वाढला आहे. आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या संघर्षामधून बुधवारी दुपारी पाथरी नगरपरिषद आवारात राडा झाला. नगरपरिषद सभागृहात आज, बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली १४४ भूमी अधिग्रहणसाठी लाभार्थी यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकी दरम्यान बाबाजानी दुर्राणी गटातून नुकतेच शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले माजी नगरसेवक अलोक चौधरी यांनी भूमी अधिग्रहण होत असलेल्या जागा मालकास नवीन आठवडी बाजार येथे प्रस्तावित शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणी संदर्भात निर्णय घेण्यात यावा आणि घरकुल लाभार्थी  निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.  

दरम्यान, बैठक पार पडताच पदाधिकारी सभागृह बाहेर आले. त्याच वेळी नगरपरिषदमध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी कार्यकर्त्यांसह दाखल झाले. नगर परिषद आवारात गेट जवळ शिवसेना शिंदे गटाचे अलोक चौधरी समोर येताच दुर्राणी यांनी त्यांना मारहाण सुरू केली. अचानक घडलेल्या घटनेमुळे पळापळ  आणि आरडाओरडा सुरू झाला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.  घटनेनंतर काही काळ शहर तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे असिफ खान अलोक चौधरी आणि इतर पदाधिकारी मोठे संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. पोलिसांनी परिस्थिती ओळखुन अधिकची कुमक वाढवली. 

गुन्हा दाखल 
याप्रकरणी अलोक चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, तबरेज खान दुर्राणी, सहजाद खान बक्तीयार खान, हमेद खान शेर खान यांच्या विरुद्ध विविध कलमाखाली  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी समर्थक पोलीस ठाण्यात दाखल झाले असून या प्रकरणी त्यांची तक्रार नोंदवण्याची कारवाई सुरू झाली होती. 

Web Title: Rada in Pathri! Former MLA Babajani Durrani assaults Shinde Sena's Alok Choudhari in Municipal Council area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.