राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:16 IST2025-02-27T13:16:13+5:302025-02-27T13:16:34+5:30
फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

राजस्थानी मल्टिस्टेटच्या अध्यक्षाला आता सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले; तीन दिवसांची कोठडी
सेलू (जि. परभणी) : ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सेलू पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात राजस्थान मल्टिस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणीस बीड कारागृहातून सेलू पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. बुधवारी परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मुदत संपूनही पैसे परत दिले नसल्याने अभय सुभेदार (रा. सेलू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशाने १० फेब्रुवारीला सेलू पोलिस ठाण्यात राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी. डी. अग्रवाल, कोषाध्यक्ष विजय प्रकाश लड्डा, सेलू येथील शाखाधिकारी नंदकिशोर सोमाणी अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोनि. दीपक बोरसे, सपोनि. प्रभाकर कवाळे यांनी तपासादरम्यान अध्यक्ष चंदुलाल बियाणी हे अंबाजोगाई येथील एका ग्राहक फसवणूक गुन्ह्यात बीड येथील कारागृहात असल्याचे पुढे आले. आरोपी चंदुलाल बियाणीला २५ फेब्रुवारीला बीड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केले असता, न्या. जी. जी. भरणे यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
फसवणूक झाली असेल तर तक्रार करा
राजस्थानी मल्टिस्टेट शाखा सेलू येथे आणखीन कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.