प्रक्रिया, मूल्यवर्धन केल्यास वाढेल आर्थिक लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST2021-03-24T04:15:33+5:302021-03-24T04:15:33+5:30
परभणी : शेतमालावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केल्यास संबंधित शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक लाभ वाढेल, असा विश्वास कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक ...

प्रक्रिया, मूल्यवर्धन केल्यास वाढेल आर्थिक लाभ
परभणी : शेतमालावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केल्यास संबंधित शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक लाभ वाढेल, असा विश्वास कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी व्यक्त केला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयातील अन्नप्रक्रिया विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी २२ ते २७ मार्च या काळात 'काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया' या विषयावर प्रशिक्षण घेतले जात आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. गोखले बोलत होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. उदय खोडके, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या परभणी जिल्हा समन्वयक नीता अंभोरे, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. विजया पवार, सुरेंद्र सदावर्ते आदींची उपस्थिती होती.
डॉ. धर्मराज गोखले म्हणाले, पीक काढणीपश्चात बाजारातील आवक वाढल्यामुळे कमी किमतीत शेतकऱ्यांना कच्च्या मालाची विक्री करावी लागते. शेतमालावर प्रक्रिया व मूल्यवर्धन केल्यास निश्चितच आर्थिक लाभ जास्त होऊन उन्नती साधता येते. शेत कामात महिलांचा प्रमुख वाटा असून, त्यांच्या उपजत पीक लागवड ते काढणीपर्यंत सर्व कामे चांगल्या प्रकारे केली जातात. शेतमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन याचे कौशल्य शेतकरी महिलांनी अवगत करावे, शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असा सल्ला डॉ. गोखले यांनी यावेळी दिला.
स्मिता अंभोरे म्हणाल्या, अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये महिला सक्षम होत असून, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे घरगुती आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून अन्नप्रक्रिया गृह उद्योग सुरू करता येतील व त्यांच्या निर्यातीसाठी संधी उपलब्ध होतील, असे त्या म्हणाल्या. खोडके यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. दीपाली गजमल यांनी सूत्रसंचालन केले. सुरेंद्र सदावर्ते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. हेमंत देशपांडे, दिलीप मोरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.