खाजगी बस - ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात १० प्रवासी, ट्रकचालक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 09:51 IST2023-05-06T09:50:51+5:302023-05-06T09:51:24+5:30
एकमेकांमध्ये अडकलेली दोन्ही वाहने जेसीबीच्या मदतीने वेगळी करण्यात आले.

खाजगी बस - ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात १० प्रवासी, ट्रकचालक गंभीर जखमी
- सत्यशील धबडगे
मानवत: तालुक्यातील रामेटाकळी शिवारात पाथरी-पोखरणी रस्त्यावर खाजगी बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना आज सकाळी 8:30 वाजता घडली. अपघातात बसमधील आठ ते दहा प्रवासी तर ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात समोरासमोर झाल्याने दोन्ही वाहनांच्या पुढचा भाग चक्काचूर झाला आहे.
तालुक्यातील रामेटाकळी शिवारातील पाथरी- पोखरणी रस्त्यावरून पुण्याहून येणारी खाजगी बस (क्रमांक एम एच 19 वाय 3232) परभणीकडे जात होती. दरम्यान, रामे टाकळ शिवारात बस आणि पाथरीकडे जाणाऱ्या ट्रकची ( क्रमांक जी जे 36 व्ही 5509) समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात खाजगी बसमधील 10 ते 11 प्रवाशी आणि ट्रक चालक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात एवढा भीषण होता की ट्रक आणि खाजगी बसचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे. एकमेकांमध्ये अडकलेली दोन्ही वाहने जेसीबीच्या मदतीने वेगळी करण्यात आले.
जखमींना अपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले. जखमींची नावे समजू शकली नाहीत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सपोनि आनंद बनसोडे, प्रभाकर कापुरे, जमादार मधुकर चट्टे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.