वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:51 IST2025-06-04T14:47:16+5:302025-06-04T14:51:14+5:30

वारीत सहभागी होण्यासाठी अश्वाचे बाभळगाव येथून विधिवत पूजा करून मिरवणूक काढून प्रस्थान झाले.

Pride of the Warkari! The Raner family's 'Devacha Ashwa' is back on the palanquin, a 100-year-old unbroken tradition | वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा

वारकऱ्यांची शान! रणेर कुटुंबाचा 'देवाचा अश्व' पुन्हा पालखीत, १०० वर्षांची अखंड परंपरा

पाथरी ( परभणी) : पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील रणेर कुटुंबीयांची पंढरपूर आषाढी वारीतील ‘देवाचा अश्व’ नेण्याची परंपरा तब्बल 100  वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. ही परंपरा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याशी निगडित असून या अश्वाला वारीत विशेष मान दिला जातो. वारीत सहभागी होण्यासाठी 4 जून रोजी या  अश्वाचे बाभळगाव येथून विधिवत पूजा मिरवणूक काढून  प्रस्थान झाले. तत्पूर्वी गावात पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. 

प्रथेनुसार, बाभळगावहून हा अश्व प्रथम थेट पंढरपूरला नेण्यात येतो. तेथे त्याची विधीपूर्वक पाद्यपूजा केली जाते. त्यानंतर हा अश्व देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे पायी प्रवास करतो. वारीदरम्यान तो उभ्या आणि आडव्या रिंगणात सहभागी होतो आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतो. बाभळगाव येथून पूर्वी हा अश्व पंढरपूर पर्यंत पायी नेण्यात येत होता मात्र आता बाभळगाव येथून वाहनाने पंढरपूर पर्यंत नेण्यात येतो तेथून पुढे पायी दिंडीत सहभागी होतो. 

१०० वर्षांची परंपरा, तीन पिढ्यांनी जपली
रणेर कुटुंबीय या अश्वाची वर्षभर मुलासारखी काळजी घेतात. तो कोणत्याही इतर कामासाठी वापरला जात नाही. साधारणतः ८ ते ९ वर्षांनी हा अश्व बदलून नवीन अश्व स्वखर्चाने खरेदी केला जातो, तर जुना अश्व मानाने निवृत्त केला जातो. ही परंपरा वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. रणेर कुटुंबीयांनी ती तीन पिढ्यांपासून निष्ठेने जपली असून आजतागायत ती भावपूर्ण श्रद्धेने सुरू आहे. 4 जून रोजी या अश्वाचे बाभळगाव येथून पंढरपूर कडे प्रस्थान करण्यात आले. गावातून विधिवत पूजा करण्यात आली टाळ मृदंग वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली,  त्या नंतर अश्व प्रस्थान झाले.

Web Title: Pride of the Warkari! The Raner family's 'Devacha Ashwa' is back on the palanquin, a 100-year-old unbroken tradition