शेतीला पाणी देताना येलदरीतून साडेसहा कोटींची वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST2021-05-23T04:16:31+5:302021-05-23T04:16:31+5:30

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, ...

Power generation of Rs. 6.5 crore from Yeldari while irrigating agriculture | शेतीला पाणी देताना येलदरीतून साडेसहा कोटींची वीजनिर्मिती

शेतीला पाणी देताना येलदरीतून साडेसहा कोटींची वीजनिर्मिती

येलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प अशी ओळख असलेल्या येलदरी प्रकल्पाने राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली असून, शेतीच्या सिंचनासाठी दिलेल्या पाण्यातून तब्बल साडेसहा कोटी रुपयांची वीजनिर्मिती केली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांतील पाणीपुरवठा योजना चालतात. लाखो नागरिकांना पिण्याचे शाश्‍वत पाणी स्रोत असलेल्या येलदरी प्रकल्पामुळे या भागातील जमीन सुपीक झाली आहे. हजारो हेक्टर शेतजमीन या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतीसाठी वरदान ठरलेला हा प्रकल्प आता राज्याच्या ऊर्जा विभागासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

येलदरी येथे पाण्याच्या साह्याने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प कार्यान्वित आहे. २२.५ मेगावॅट प्रतिदिन वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. या प्रकल्पातून सोडलेले पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून वीजनिर्मिती होते.

मागील वर्षी येलदरी प्रकल्प १०० टक्के पाण्याने भरला. त्यामुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाणी उपलब्ध झाले. येलदरी प्रकल्पातून रब्बी, खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पहिल्या पाणी आवर्तनातून ७८ लाख ५१ हजार युनिट विजेची निर्मिती करण्यात आली. दुसऱ्या पाणी आवर्तनातून ७५ लाख ४७ हजार आणि सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या पाणी आवर्तनातून ५५ लाख ३ हजार युनिट वीजनिर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्याबरोबरच या प्रकल्पाने ऊर्जानिर्मितीचे काम केले असून, राज्याच्या ऊर्जा खात्यात ६ कोटी ४७ लाख रुपयांची वीज जमा केली आहे.

१४ कोटींपेक्षा अधिक वीजनिर्मिती

गतवर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरला होता. त्यानंतर सलग ७२ दिवस हा प्रकल्प सुरू राहिला आहे. या काळात केलेल्या वीजनिर्मितीतून राज्याच्या तिजोरीत सुमारे १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल या प्रकल्पाने जमा केला आहे. १९६१ साली या प्रकल्पाची निर्मिती झाली असून, या प्रकल्पास ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्याही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करीत आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्याचप्रमाणे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील २३२ गावांच्या पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. परभणी, नांदेड महापालिकेसह अनेक नगरपालिकांच्या पाणीपुरवठा योजनाही याच प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

Web Title: Power generation of Rs. 6.5 crore from Yeldari while irrigating agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.