अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमेस स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:35+5:302021-04-05T04:15:35+5:30
केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार पुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकांची तपासणी मोहीम राज्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या ...

अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमेस स्थगिती
केंद्राने दिलेल्या निर्देशानुसार पुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकांची तपासणी मोहीम राज्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत रेशनचे धान्य घेणाऱ्या व एक लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबप्रमुखांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या दृष्टिकोनातून पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. यासाठी तालुकास्तरावर पथकांची स्थापनाही करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती; परंतु गेल्या महिनाभरात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत आहे. अशा स्थितीत घरोघरी जाऊन रेशन कार्डची माहिती घेणे, धोक्याचे होते. त्यामुळे ही मोहीम रद्द करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याआनुषंगाने १ एप्रिल रोजी पुरवठा विभागाने पत्र काढले आहे. त्यात मात्र ही मोहीम प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतरही ही मोहीम सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.