भीम जयंती साजरी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:40+5:302021-04-06T04:16:40+5:30
१४ एप्रिल रोजी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जयंती उत्सवाला परवानगी ...

भीम जयंती साजरी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका
१४ एप्रिल रोजी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जयंती उत्सवाला परवानगी द्यावी, या मागणीसाठी ५ एप्रिल रोजी गौतम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी. एच. सहजराव, डी. एन. दाभाडे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, गौतम मुंडे, आकाश लहाने, सुधीर कांबळे, उमेश लहाने, आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या संदर्भाने प्रशासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तेव्हा नियम व अटींचे पालन करूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, यासाठी माझी सकारात्मक भूमिका आहे, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले. परभणी येथे ४ एप्रिल रोजी ३० ते ३५ जयंती मंडळांच्या अध्यक्षांची बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याची भूमिका मांडण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करू, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले होते, असेही मुगळीकर यांना सांगण्यात आले. जयंती उत्सव मंडळाच्या आणि आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसांत व्यापक बैठक घेऊन जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरा करता येईल, यासाठी नियोजन करण्यात येईल. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर जयंतीस परवानगी देण्यासाठी सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेचे शिष्टमंडळाने स्वागत केले आहे. लवकरच आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते व जयंती समितीचे अध्यक्ष यांची जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचेही या शिष्टमंडळाने सांगितले.