पोलिसांच्या धाडीत जिममधून रिव्हाल्व्हर जप्त; एकजण अटकेत, एक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 17:46 IST2021-02-24T17:46:19+5:302021-02-24T17:46:37+5:30
विना परवाना रिव्हाल्व्हर बाळगल्या प्रकरणी पाथरीत एका आरोपीस अटक

पोलिसांच्या धाडीत जिममधून रिव्हाल्व्हर जप्त; एकजण अटकेत, एक फरार
पाथरी - शहरातील अजीज मोहला भागातील जिममधून एक रिव्हाल्व्हर परभणी येथील पोलीस पथकाने बुधवारी ( दि. 24 ) पहाटे 5 वाजेच्या सुमारास जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून अन्य एक फरार आहे.
पाथरी शहरातील अजीज मोहला भागात सईद चाऊस महमद चाऊस यांची जिम आहे. सईद चाऊस हा विना परवाना रिव्हाल्व्हर वापरत असल्याची माहिती गस्तीवर असणाऱ्या परभणी येथील पथकाला मिळाली. या माहितीवरून सपोनि अलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पवार सोबत पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, साईंनाथ पुएड पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, हनुमंत जेकेवड, अरुण पांचाल, भारत नलवाड़े, शंकर गायकवाड, संतोष सानप, यशवंत वाघमारे , विष्णु भिसे, अजहर पटेल, दीपक मुदिराज, सुधीर काळे, चालक अरूण कांबले यांच्या पथकाने सईद चाऊस यास घरातून पहाटे 5 च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर जिममध्ये धाड टाकत तेथे ठेवलेली विना परवाना रिव्हाल्व्हर जप्त केली. या प्रकरणी परभणी येथील पोलीस कर्मचारी भारत नलावडे यांच्या फिर्यादी वरून आरोपी सईद चाऊस आणि परभणी येथील सोनू पांचाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सईद चाऊस यास अटक करण्यात आली आहे तर दुसरा आरोपी फरार झाला आहे.