पोलिसांची तरुणावर लाथाबुक्क्यांनी कारवाई; अमानुष मारहाणीच्या सलग तिसऱ्या घटनेने जिंतूरमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 17:09 IST2021-05-19T17:06:13+5:302021-05-19T17:09:01+5:30

जिंतूर शहरांमध्ये मागील काही दिवसापासून पोलिसांच्या मारहाणीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे.

Police officer brutally beaten youth; in Jintur with the third incident of inhuman beating in a row | पोलिसांची तरुणावर लाथाबुक्क्यांनी कारवाई; अमानुष मारहाणीच्या सलग तिसऱ्या घटनेने जिंतूरमध्ये संताप

पोलिसांची तरुणावर लाथाबुक्क्यांनी कारवाई; अमानुष मारहाणीच्या सलग तिसऱ्या घटनेने जिंतूरमध्ये संताप

जिंतूर : संचारबंदीच्या काळात शेती साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांनी लाथाबुक्क्यांनी भररस्त्यावर जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याची शहरातील ही तिसरी घटना आहे. ही मारहाण सोमवारी संध्याकाळी शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात झाली असून याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जिंतूर शहरांमध्ये मागील काही दिवसापासून पोलिसांच्या मारहाणीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. शहरांमध्ये संचारबंदीच्या काळात कोणी विनाकारण घराबाहेर पडू नये याबाबत प्रशासन आव्हान करीत असतानाही अनेक जण रस्त्यावर दिसतात. याविरोधात पोलीस अनेकदा बळाचा वापर करत आहेत. मात्र, जिंतूर शहरांमध्ये मागील तीन घटना पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. पोलिसांच्या एका घटनेत मारहाणीनंतर व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका व्यापाऱ्याला पोलिसांनी जबर मारहाण केली. आता हे अमानुष मारहाणीचे तिसरे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात पोलीस उपनिरीक्षक तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, सोमवारी संध्याकाळी शेजारील गावातून एक तरुण शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी जिंतूर येथे आला होता. साहित्य खरेदीनंतर तरुण गावाकडे परतत होता. यावेळी अण्णाभाऊ साठे चौकात त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी चौकशी करताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन पवार यांनी त्या तरुणास शिवीगाळ करून भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचं व्हिडिओ व्हायरल झाला. सध्या शेतीची कामे सुरु असल्याने शेतकरी साहित्य खरेदी साठी बाजारात येत आहेत. यासाठी प्रशासनाची मुभा देखील आहे.  पोलिसांनी कोणी चुकत असेल तर कायदेशीर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत, दंडात्मक कारवाई करावी मारहाण का केली जाते असा संताप यानंतर नागरिकांनी व्यक्त केला आहे. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या मारहाणीचा विपरीत परिणाम एखाद्याच्या आयुष्यावर होऊ शकतो. यापूर्वी असेच भररस्त्यात मारहाण झाल्यानंतर एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली होती. यामुळे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. या काळात कोणी चुकत असेल तर बळाचा वापर न करता दंडात्मक कारवाई करावी किंवा गुन्हे दाखल करावे. त्याऐवजी अमानुष मारहाण करणे अत्यंत चूक आहे. 
 - ऍड मनोज सारडा, सामाजिक कार्यकर्ते, जिंतूर

या प्रकरणाबाबत चौकशी करत आहे. स्वतः लक्ष घालून याची माहिती घेत आहे.
- श्रवण दत्त, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, जिंतूर

Web Title: Police officer brutally beaten youth; in Jintur with the third incident of inhuman beating in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.