पोलिसांनी उधळला दरोड्याचा प्लॅन, घातक शस्त्रासह चौघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 17:49 IST2024-07-27T17:37:48+5:302024-07-27T17:49:28+5:30
एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.

पोलिसांनी उधळला दरोड्याचा प्लॅन, घातक शस्त्रासह चौघे अटकेत
- सत्यशील धबडगे
मानवत ( परभणी) : प्राण घातक हत्यारासह दरोडा टाकण्याची तयारीने कारमधून परभणीकडे जाणाऱ्या चौघांना मोठ्या शिताफीने मानवत पोलिसांनी आज पहाटे 3: 30 वाजता अटक केली. यावेळी एक कार, धारदार शस्त्र आणि इतर साहित्य असा एकूण तीन लाख २६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शहरात पो नि संदीप बोरकर पो उ नि विष्णुपंत घोडके,पो ह शेख जावेद, बंकट लटपटे, सय्यद फैयाज यांचे पथक शुक्रवारी रात्री गस्तीवर होते. पहाटे ३ वाजता विनानंबरच्या कारमध्ये काहीजण दरोडा टाकण्याच्या तयारीने परभणीकडे जात असल्याची गोपनीय माहिती या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.
दरम्यान, पहाटे 3.30 वाजता एक कार रस्त्यावरील शोरुमजवळ असलेल्या रस्त्याच्या खाली जाऊन थांबली. याचेवेळी पोलिसांनी तिकडे धाव घेतली असता एकजण गाडीतून उतरून पसार झाला. तर शैलेश कारभारी भोसले, सतिश रामभाउ चव्हाण ( रा लिंबा ता पाथरी) , सोनुसिंग पुनमसिंग टाक ( रा. उड्डाण पुल नवा मोंढा परभणी) , जितेंद्रसिंग अवतारसिंग जुन्नी ( रा विकास नगर, परभणी) यांना पोलिसांनी अटक केली. कारची तपासणी केली असता त्यात प्राणघातक हत्यार, दरोडा टाकण्यास उपयोगी साहित्य आढळून आले. याप्रकरणी पोउनि विष्णुपंत घोडके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तर एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संदीप बोरकर करीत आहेत.