सेलू येथील ३ आरोपी पोलिसांना सापडेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:40+5:302021-03-25T04:17:40+5:30
सेलू : रेशनचे धान्य काळ्या बाजारात मंठा येथे विक्रीसाठी नेला जाणारा आठ टन तांदूळ ट्रकसह जप्त करून पाच दिवस ...

सेलू येथील ३ आरोपी पोलिसांना सापडेनात
सेलू : रेशनचे धान्य काळ्या बाजारात मंठा येथे विक्रीसाठी नेला जाणारा आठ टन तांदूळ ट्रकसह जप्त करून पाच दिवस उलटले आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यापलीकडे चौकशीची चक्रे फिरली नाहीत. त्यामुळे तीनही आरोपी अद्याप उजळ माथ्याने मोकाट फिरत असल्याचे दिसून येत आहे.
परभणी जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा व सेलू पोलिसांच्या संयुक्त पथकाने १८ मार्च रोजी कारवाई करीत रेशनचा ८० क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा आयशर ट्रक
(क्रमांक एमएच ०४ डीडी ३१९५) नूतन महाविद्यालयासमोर पाठलाग करत पकडला होता. ट्रकचालक शेख रहीम शेख उस्मान (रा. मोमीनपुरा, ईदगाहनगर, मंठा ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने देऊळगाव गात येथून ट्रक तांदळाने भरून मंठा येथे नेत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. या प्रकरणात ट्रकमधील तांदूळ रेशनचा आहे की नाही, याबाबत पोलिसांनी महसूल प्रशासनाकडे अहवाल मागितला होता. प्रशासनाने पंचनामा केला असता, चालक शेख रहीम याने देऊळगाव गात येथील तांदूळ भरल्याचे घटनास्थळ दाखविले. तांदूळ रेशनचाच आहे, अशी खात्री झाल्यावर नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी २० मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी ट्रकमालक इसाभाई कुरेशी (रा. मंठा), देऊळगाव गात येथील रेशन गोडावून मालक विजय बप्पा अंभोरे व ट्रकचालक शेख रहीम या आरोपींविरुद्ध २० मार्च रोजी सायंकाळी ७.५० वाजता गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्याकडे आहे. या प्रकरणात २ लाख ८० हजार रुपये किमतीचा तांदूळ आणि पाच लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मात्र मुख्य आरोपीसह तीनही आरोपी अद्याप उजळ माथ्याने मोकाट फिरत आहेत.
पाच दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व रेशन माफियांचे लागॆबांधे आहेत का? अशी चर्चा शहारासह तालुक्यात आहे.
तपास पोलीस निरीक्षकांकडे
परभणी जिल्ह्यात रेशन धान्य विक्री करणारी मोठी टोळी तालुक्यात सक्रीय असून, मुख्य आरोपी इसाभाई कुरेशी यांना अटक होत नाही. तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नसल्याचे बोलले जात आहे.
परंतु, तपास अधिकारी खुद्द पोलीस निरीक्षक भुमेच असल्याने तपासाबाबत शंका उपस्थित होत असल्याची चर्चा आहे.