परभणी : लाच स्वीकारणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:46 IST2019-06-22T00:45:48+5:302019-06-22T00:46:15+5:30
वाळू भरताना पकडलेल्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांसह एक शिपाई व एक खाजगी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

परभणी : लाच स्वीकारणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): वाळू भरताना पकडलेल्या जेसीबी मशीनवर कारवाई न करण्याच्या मागणीसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकांसह एक शिपाई व एक खाजगी व्यक्ती अशा तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महातपुरी येथे एका वाहनामध्ये वाळू भरताना पोलीस उपनिरीक्षक बाबू गिते, पोलीस शिपाई गौतम भालेराव यांनी जेसीबी मशीन पकडली होती. या वाहनावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच खाजगी इसम लक्ष्मण फड (रा.खादगाव) याने मशीन मालक तक्रारदारास सारखे फोन करुन समक्ष पैसे देऊन प्रकरण मिटवून घ्या, असे सांगितले. मात्र जेसीबी मशीन चालकाला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्याने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार २० जून रोजी गंगाखेड येथे सापळा लावला.
सायंकाळी ६.१८ वाजेच्या सुमारास परळी रोडवरील एका हॉटेलसमोर असलेल्या कारमध्ये उपनिरीक्षक बाबू गिते यांनी तक्रारदाराकडून लाचेची २० हजार रुपयांची रक्कम घेतली व ते निघून गेले व घाईगडबडीत लाचलुचपत विभागाने ठरवून दिलेल्या खुणेप्रमाणे आपण इशारा करु शकलो नाही व त्यानंतर दूरवर कारचा पाठलाग करुनही गिते आढळून आले नाहीत, अशी फिर्याद तक्रारदाराने गंगाखेड ठाण्यात दिली. त्यावरुन उपनिरीक्षक गिते, शिपाई भालेराव व खाजगी व्यक्ती लक्ष्मण फड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.