परभणी : बोरी येथील टोळीस पोलिसांनी केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:17 IST2019-06-15T00:16:36+5:302019-06-15T00:17:00+5:30
शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करुन गुन्हे घडवून आणणाऱ्या तिघांना जणांच्या बोरी येथील टोळीस पोलिसांनी हद्दपार केले आहे.

परभणी : बोरी येथील टोळीस पोलिसांनी केले हद्दपार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करुन गुन्हे घडवून आणणाऱ्या तिघांना जणांच्या बोरी येथील टोळीस पोलिसांनी हद्दपार केले आहे.
बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओंकार दत्तराव चौधरी, विलास जालिंदर चौधरी, जयदीप प्रकाश देशमुख आणि पवन विलास चौधरी यांच्याविरुद्ध २०१५ पासून ते २०१८ पर्यंत बोरी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असून टोळीप्रमुख ओंकार चौधरी याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये ओंकार चौधरी यास तीन महिन्यांसाठी जिंतूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही तीन दखलपात्र गुन्हे घडवून आणले. २०१८ मध्ये ग्रामस्थ, व्यापारी व महिलांनी या टोळीपासून दहशतमुक्त करावे, असा लेखी अर्जही पोलिसांना दिला होता. त्यावरुन हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
या प्रकरणात २५ मे रोजी सुनावणी होऊन टोळी प्रमुख ओंकार चौधरी यास १८ महिन्यांसाठी तर विलास चौधरी, जयदीप देशमुख यांना प्रत्येकी १२ महिन्यांसाठी जिंतूर, परभणी, सेलू, मानवत, पाथरी तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा, सेनगाव, वसमत या तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. या आदेशाप्रमाणे हद्दपार व्यक्तींना बोरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार व पोलीस नाईक सुनील गिरी यांनी ताडकळस येथे नेऊन सोडले आहे.