परभणीतील चिद्रवार नगरात बंद घर फोडून ऐवज पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:12 IST2019-02-18T14:10:05+5:302019-02-18T14:12:34+5:30
लॉकही लोखंडी गजाच्या सहाय्याने तोडून चोरटे घरात घुसले़

परभणीतील चिद्रवार नगरात बंद घर फोडून ऐवज पळवला
परभणी- शहरातील जुना पेडगाव रोड भागातील चिद्रवार नगरातील कुलपबंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज पळविला आहे़ या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे़
येथील चिद्रवार नगरातील रहिवासी उमाकांत कत्रूवार हे कुटूंबासह शनिवारी सायंकाळी ४़३० वाजेच्या सुमारास नांदेड येथे गेले होते़ त्यामुळे घराला कुलूप लावले होते़ ही संधी साधत चोरट्यांनी चिद्रवार यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचा कडीकोंडा व कुलूप तोडले़ विशेष म्हणजे या दरवाज्याला स्मार्ट लॉक लावले होते़ हे लॉकही लोखंडी गजाच्या सहाय्याने तोडून चोरटे घरात घुसले़ घरातील तीन कपाट फोडून सोन्या, चांदीचे दागिने व रोख ७ ते ८ हजार रुपये असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला़
सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उमाकांत चिद्रवार हे घरी परतले तेव्हा चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला़ कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला़ श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते़ या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस तपास करीत आहेत़