मुंबईच्या आंदोलकांसाठी परभणीकरांची घरची गोडधोड शिदोरी; ७५ हजार किट्स आंदोलनस्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:23 IST2025-09-01T19:20:35+5:302025-09-01T19:23:19+5:30
परभणीकर मैदानात! मुंबईतील आंदोलकांसाठी पाठवल्या घरच्या शिदोरीच्या ७५ हजार किट्स

मुंबईच्या आंदोलकांसाठी परभणीकरांची घरची गोडधोड शिदोरी; ७५ हजार किट्स आंदोलनस्थळी
परभणी : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांच्या जेवण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी परभणी जिल्ह्याने एकजुटीचे दर्शन घडवले. सोमवारी पहाटे परभणीतून रवाना झालेले चार टन जेवणाचे साहित्याच्या ७५ हजार किट्स दोन ट्रकमधून आझाद मैदानावर पोहोचल्या.
जिल्ह्यातील समाजबांधवांनी जबाबदारीची भावना जपत आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक शिदोरी उपलब्ध करून दिली. भाकरी, ठेचा, चटणी, लोणचं, कांदा, तसेच सणासुदीचे गोडधोड पदार्थ यात समाविष्ट असल्याने आंदोलनकर्त्यांना घरगुती जेवणाचा आस्वाद मिळाला. या साहित्यामुळे उपोषणस्थळी गेल्या चार दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू झालेल्या या उपोषणासाठी परभणी जिल्ह्यातील युवकांनी २७ ऑगस्टपासूनच आंतरवली सराटीकडे कूच सुरू केली. त्यानंतर दररोज हजारो वाहनांमधून मराठा समाजबांधव मुंबईत पोहोचू लागले. गणेशोत्सव आणि महालक्ष्मीच्या सणाच्या दिवसांतही समाजातील तरुणांनी सणाला दुय्यम स्थान देत लाखोंच्या संख्येने आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. १ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल झाले असून, या लढ्याला भक्कम ताकद मिळाली आहे.
समाजाच्या एकतेचे दर्शन
आंदोलनकर्त्यांची शिदोरीसाठी परभणीत खास मदत कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले की, “प्रत्येक घरातून दहा भाकऱ्या, ठेचा, चटणी, कांदा, लोणचं आणि सणासाठी गोडधोड कार्यालयात जमा करावे.” या आवाहनाला जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काही तासांतच प्रचंड प्रमाणात साहित्य जमा झाले. परभणीकरांनी पुन्हा एकदा आपली उदारता सिद्ध केली आणि समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले.
दोन ट्रकमधून सोमवारी पोहोचले मुंबईत
जमा झालेल्या साहित्याचे नियोजन करून कार्यकर्त्यांनी पद्धतशीर तयारी केली. भाकरी, चटणी, लोणचं, कांदा आणि गोडधोड यांचे मिश्रण करून ७५ हजार किट्स तयार करण्यात आल्या. या किट्स रविवारी उशिरा रात्री दोन मोठ्या ट्रकमधून मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. सोमवारी पहाटे हे ट्रक आझाद मैदानावर दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांच्या हाती जेवणाच्या पिशव्या पोहोचल्या.
समाजमाध्यमातही आरक्षणाचाच बोलबाला
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक गावे व शहरांतून अजूनही मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. सोशल मीडियावरूनही जिल्ह्यातील तरुण शासनावर दबाव आणत आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि विविध डिजिटल माध्यमांतून आंदोलनाचे फोटो व व्हिडीओ शेअर करून आरक्षणाच्या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.