परभणी:रिपब्लिकन सेनेचा धडकला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:41 IST2018-01-09T00:36:11+5:302018-01-09T00:41:04+5:30
जायकवाडी कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांना माता रमाई व पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी झोपडपट्टीधारक लाभार्थ्यांनी ८ जानेवारी रोजी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

परभणी:रिपब्लिकन सेनेचा धडकला मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जायकवाडी कालव्याच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांना माता रमाई व पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी झोपडपट्टीधारक लाभार्थ्यांनी ८ जानेवारी रोजी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील गुलशनाबाग परिसरातून शेकडो लाभधारक सुपरमार्केटमार्गे जायकवाडीतील कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयापर्यंत पोहचले. महिला-पुरुष मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
१९९५ पूर्वीच्या झोपड्या नियमित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशाची राज्यभरात अंमलबजावणी होत असताना परभणी जिल्ह्यात मात्र पायमल्ली होत आहे. नांदेड जिल्ह्यात कॅनॉलच्या बाजुने असलेली अतिरिक्त जागा महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यामुळे कॅनॉलच्या परिसरात असलेल्या झोपडपट्टीधारकांचा प्रश्न सुटला आहे.
परभणी शहरात जायकवाडीच्या कॅनॉल परिसरात झोपडपट्टीधारकांना जायकवाडी विभागाकडून नाहकरत प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी हे लाभार्थी माता रमाई व पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. तेव्हा सर्व लाभार्थ्यांंना नाहकरत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात चंद्रकांत लहाने, सिद्धार्थ कसारे, अरुण लहाने, किरण घोंगडे, निलेश डुमणे, रमेश भिंगारे, सचिन खरात, तुषार कांबळे, माधव वानखेडे, अशिष वाकोडे, मिलिंद हजारे, संजय खिल्लारे, राहुल कांबळे, कपील गवळी, महेंद्र गाडेकर, सरुबाई जमदाडे, रेणुकाबाई झोडपे, चतुराबाई ठोके आदींसह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. तीन तास हे आंदोलन चालले.