परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:25 IST2025-06-24T18:23:38+5:302025-06-24T18:25:04+5:30

राज्यातील एकूण २० श्वान प्रशिक्षणासाठी आले होते. त्यातून बोल्टने प्रथम क्रमांक मिळविला.

Parbhani Police Force proud; Dog Bolt tops the list in detecting explosives | परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल

परभणी पोलीस दलाची उंचावली मान; स्फोटक पदार्थ शोधण्यात श्वान बोल्ट ठरला अव्वल

- राजन मंगरुळकर
परभणी :
पोलीस दलातील श्वान पथकात बॉम्ब शोधक व नाशक दलामध्ये दाखल झालेल्या बोल्ट या श्वानाने पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. या प्रशिक्षणात घेण्यात आलेल्या परीक्षेत स्फोटक पदार्थ शोधण्याच्या प्रक्रियेत त्याने राज्यातून प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे बोल्टच्या कामगिरीने जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.

पोलिसांना गंभीर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी श्वान पथक कार्यरत असते. बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये सध्या एकूण सहा श्वान आहेत. यातील लेब्राडॉग जातीचे बोल्ट नावाचे श्वान जिल्हा पोलीस दलात मागील वर्षी दाखल झाले. सहा महिन्यांचे बोल्ट श्वान हे २० डिसेंबर ते २२ जून या कालावधीत पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाला गेले होते. तेथे स्फोटक पदार्थ ओळखणे, संशयित वस्तूंची तपासणी, विविध प्रकारचे ज्वलनशील आणि स्फोटक कसे निकामी करायचे, याशिवाय वेगवेगळे सर्च ऑपरेशन राबविताना श्वानाने करावयाची कामे याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले. प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात त्याची परीक्षाही घेण्यात आली. यात सुध्दा त्याने चुणूक दाखविली. राज्यातील एकूण २० श्वान या कालावधीत प्रशिक्षणासाठी आले होते. त्यातून बोल्टने प्रथम क्रमांक मिळविला.

अवघे एक वर्ष वयमान
पोलीस दलात श्वान बोल्ट दाखल झाले तेव्हा त्याचे वय केवळ सहा महिने होते. यानंतर सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून आता ते पोलीस दलात पुढील तपास आणि विविध कामांसाठी सज्ज झाले आहे. साधारण पुढील दहा वर्ष हे श्वान पोलीस दलात कार्यरत राहू शकते.

पथकाकडे केले सुपूर्द...
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर श्वान बोल्ट याचे स्वागत करुन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एम.तोटेवाड, डॉग हँडलर साहेब तोटेवाड, सीता वाघमारे, इमरान शेख यांच्याकडे सुपूर्द केले. आता श्वानाची मदत परभणीच्या पोलिसांना वेगवेगळ्या कामासाठी आगामी काळात होणार आहे. या प्रशिक्षणासाठी श्वानासोबत डॉग हँडलर साहेब तोटेवाड, सीता वाघमारे यांनीही सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण पूणे येथील डीवायएसपी यादव तुमरेड्डी,  पोलीस निरीक्षक संजय नेरकर, राजेश चव्हाण, उदय कळसे, सुप्रिया केंद्रे यांनी श्वानाला दिले.

Web Title: Parbhani Police Force proud; Dog Bolt tops the list in detecting explosives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.