परभणी: पाण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:51 IST2019-04-01T23:50:39+5:302019-04-01T23:51:08+5:30
तालुक्यातील लोखंडी पिंपळा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी १ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़

परभणी: पाण्यासाठी महिलांचा तहसीलवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): तालुक्यातील लोखंडी पिंपळा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिलांनी १ एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़
पिंपळा लोखंडे या गावात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने पंचायत समितीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो़ यावर्षीही गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे दररोज ४८ हजार लिटर पाण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीकडे करण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारीपासून गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या गावाला पाणीपुरवठा केला जातो़ या टँकरची क्षमता ८ हजार लिटर असून, दिवसांतून २ फेऱ्या केल्या जातात़ मात्र रात्रीच्या वेळी टँकर चालक टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे़ याबाबत तालुका प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठ्यात वाढ होत नसल्याने सोमवारी महिलांसह गावातील ५०० ग्रामस्थांनी तहसीलवर धडक मोर्चा काढला़
माजी सरपंच तुकाराम लोखंडे, अॅड़ बालाजी लोखंडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार श्याम मदनूरकर यांना पाण्याच्या वाढीव पुरवठ्याबाबत निवेदन देण्यात आले़ याबाबत तहसीलदारांनी लवकरच वाढीव पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला़