परभणी : खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:20 IST2018-05-30T00:20:20+5:302018-05-30T00:20:20+5:30
पाथरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भूमिअभिलेखचे सर्व्हर चालत नसल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

परभणी : खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील भूमिअभिलेखचे सर्व्हर चालत नसल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य शासनाने खरेदी विक्री व्यवहारात गैरप्रकार टाळण्यासाठी आणि पारदर्शकता येण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व व्यवहार आॅनलाईन केले आहेत. आॅनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार करीत असताना या प्रणालीत ई- फेरफारही केला जात आहे. त्यामुळे खरेदी विक्री व्यवहारासोबतच आता भूमिअभिलेखवरील सातबारावर झालेल्या व्यवहाराची आॅनलाईन नोंदणी झाल्याशिवाय खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होत नाही. खरेदी विक्रीचे दस्ताऐेवज तयार झाल्यानंतर त्याची लॅन्डरेकॉर्ड साईटवर नोंदणी करण्यात येते. या प्रक्रियेत सुधारणा करीत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
२८ मे रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी विक्रीचे सुरू होते. मात्र भूमिअभिलेखचे सर्व्हर डाऊन असल्याने आॅनलाईन सातबारा दिसत नव्हत्या. त्यामुळे शेती खरेदी विक्रीचे व्यवहार झालेच नाहीत. २९ एप्रिल रोजीही अशीच परिस्थिती असल्याने दुसºया दिवशीही व्यवहार झाले नाहीत.
२८ मे रोजी शेतीचे व्यवहार करण्यासाठी चार दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल झाले होते. २९ रोजीही शेतकरी कार्यालयात सकाळीच दाखल झाले होते; परंतु, सकाळपासूनच भूमिअभिलेखचे सर्व्हर बंद पडल्याने दोन दिवस व्यवहार झाले नाहीत. त्यामुळे व्यवहारासाठी आलेल्या शेतकºयांना दिवसभर कार्यालयात ताटकळत थांबावे लागले.
ई-फेरफार प्रणालीत गोंधळ
सध्या महसूल विभागात सातबारा आॅनलाईन करण्यासोबतच सर्व सातबारा डिजिटल स्वाक्षरीशी जोडली जात आहेत. त्यासोबतच खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना आॅनलाईन सातबारावर ई-फेरफार सुद्धा त्याचवेळी केले जात आहेत. सर्वच तालुक्याच्या ठिकाणी सातबारा उतारे आॅनलाईन आणि डिजीटल स्वाक्षरी जोडण्याचे काम सुरू असल्याने सर्व्हर डाऊन होत आहे. ई-फेरफारसाठी कार्यरत असलेले एलआर सर्व्हर दोन दिवसांपासून पूर्णत: डाऊन असल्याने महसूल विभागाच्या कामाचा खोळंबा झाला आहे. यासोबतच खरेदी विक्री व्यवहारालाही फटका बसला आहे. हा प्रश्न सुटण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील, असा अंदाज कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.
शेतीचे खरेदी-विक्री व्यवहार करताना ई-फेरफार प्रणालीतील एलआर सर्व्हर डाऊन झाल्याने दोन दिवस व्यवहार होऊ शकले नाहीत.
-पी.आर. कुरुडे
दुय्यम निबंधक, पाथरी