परभणी : एटीएमच्या सहाय्याने खात्यातून परस्पर लांबविले २२ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:59 IST2019-05-11T23:57:28+5:302019-05-11T23:59:30+5:30
एटीएम कार्डाचा क्रमांक हस्तगत करुन अज्ञात तीन आरोपींनी एका महिलेच्या बँक खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतल्याची घटना परभणी शहरात घडली आहे.

परभणी : एटीएमच्या सहाय्याने खात्यातून परस्पर लांबविले २२ हजार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एटीएम कार्डाचा क्रमांक हस्तगत करुन अज्ञात तीन आरोपींनी एका महिलेच्या बँक खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतल्याची घटना परभणी शहरात घडली आहे.
या संदर्भात सुनील बापुसाहेब गोंडे यांनी नवा मोंढा पोलिसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार ९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास सुनील बोंडे हे वसमत रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रावर गेले होते. पत्नीच्या नावे असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजलगाव शाखेतील खात्यातून पैसे काढण्याच्या उद्देशाने ते या एटीएम केंद्रावर आले. दरम्यान, एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर ते अडकले. त्यामुळे या केंद्रावर असलेल्या अज्ञात तीन व्यक्तींनी अडकलेले एटीएम कार्ड काढून दिले. तुम्ही या कार्डातून पैसे उचलू शकत नाहीत, असे या व्यक्तींनी सांगितले. त्यामुळे सुनील बोंडे हे त्या ठिकाणाहून निघून गेले; परंतु, तेवढ्यात आरोपींनी एटीएमकार्डचा कोड नंबर जाणून घेतला आणि या खात्यातून २२ हजार रुपये काढून घेतले. ९ मे रोजी ही घटना घडल्यानंतर सुनील बोंडे यांनी १० मे रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरुन अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक बोंडले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
बामणीत दोन जुगाऱ्यांविरुद्ध कारवाई
लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळवित असताना पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. बामणी येथे पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी उत्तम केरोजी रणखांब, लक्ष्मण लिंबाजी नेमाडे हे दोघे मटका खेळवित असताना आढळले. दोघांविरुद्धही गुन्हा नोंद झाला आहे.