परभणी :जीपीएसमुळे उघडकीस आली ट्रक चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:36 IST2018-02-07T00:36:00+5:302018-02-07T00:36:04+5:30
चोरलेल्या ट्रकला जीपीएस सिस्टीम असल्याची माहिती आरोपींना नव्हती़ परंतु, याच जीपीएसमुळे आंध्रप्रदेशातून केलेली ट्रक चोरी उघडकीस आली असून, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले आहे़

परभणी :जीपीएसमुळे उघडकीस आली ट्रक चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चोरलेल्या ट्रकला जीपीएस सिस्टीम असल्याची माहिती आरोपींना नव्हती़ परंतु, याच जीपीएसमुळे आंध्रप्रदेशातून केलेली ट्रक चोरी उघडकीस आली असून, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले आहे़
आंध्रप्रदेशातील करीमनगर येथील एऩ मारोती राव यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एपी १५ एक्स- ९५२२) शासकीय कामासाठी लावलेला आहे़ ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी करीमनगर परिसरातीलच लॉरी हाऊसमध्ये हा ट्रक उभा केला होता़ या ठिकाणाहून चोरट्यांनी ट्रक पळविला़ या घटनेनंतर ५ फेब्रुवारी रोजी करीमनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली़ ट्रक चोरीचा तपास करीत असताना ट्रकला लावलेला जीपीएसवरून हा ट्रक परभणीत असल्याचे निदर्शनास आले़ आंध्रातील पोलिसांनी येथील नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांच्याशी संपर्क साधून धार रोड परिसरात या ट्रकचे जीपीएस लोकेशन दाखविले जात असल्याचे सांगितल़े़ गाडेकर यांनी एपीआय सुनील पुंगळे, सय्यद उमर, संजय पुरी, त्र्यंबक बडे, शेख उस्मान या पोलीस कर्मचाºयांना धार रोड परिसरात पाठविले़ मात्र दिवसभर या भागात शोध घेऊनही ट्रक सापडला नाही़ त्यानंतर आंध्रप्रदेशच्या पोलिसांनी प्रत्यक्ष जीपीएस लोकेशन दिले़ या लोकेशनचा झिरो पाँर्इंट काढला तेव्हा धार रोड भागातील एका शेडमध्ये ट्रकची तोडफोड करीत असताना निदर्शनास आले़ पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून करीमनगर ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मीराज यांना ट्रकविषयी माहिती दिली़ ६ फेब्रुवारी रोजी उपनिरीक्षक लक्ष्मीराज व नानलपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणात पूर्णा तालुक्यातील सुहागन येथून गजानन संभाजी भोसले यास ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़