परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:11 IST2018-10-16T00:09:54+5:302018-10-16T00:11:10+5:30
आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़

परभणी : आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना परत जाता येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आंतर जिल्हा बदलीनंतर समाधानकारक ठिकाण न मिळाल्याने रुजू झाले नसलेल्या जिल्हा परिषदेच्याशिक्षकांना ते ज्या जिल्ह्यातून आले, त्या जिल्ह्यात त्यांना परत जाण्याची संधी शिक्षण विभागाने दिली आहे़
या संदर्भात राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे अव्वर सचिव पी़एस़ कांबळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच एक आदेश काढण्यात आला आहे़ त्यात म्हटले आहे की, २०१७ व २०१८ या वर्षामध्ये राज्यातील ८ हजार ५०० शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत़ काही शिक्षकांनी त्यांच्या इच्छेनुसार बदली होवूनही कौटुंबिक अडचणी तसेच जोडीदाराची त्यांच्यासोबत बदली न झाल्याने व अन्य कारणामुळे बदली रद्द करण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे़ यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये संबंधितांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे, त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश संबंधित सीईओंनी काढावेत, संबंधितांना कार्यमुक्त केले असल्यास व त्यांना बदली नको असल्यास त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जायचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे आवश्यक आहे़ संबंधित शिक्षकाने आंतर जिल्हा बदली रद्द केल्यानंतर पुढील पाच वर्षे त्यांना आंतर जिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही, या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवा ज्येष्ठता बाधित होणार नाही, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़