परभणी : गणपतीच्या मूर्तीसमोर चौदाशे रोपांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:34 IST2019-09-11T00:32:38+5:302019-09-11T00:34:27+5:30
वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे.

परभणी : गणपतीच्या मूर्तीसमोर चौदाशे रोपांची आरास
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे.
परभणी जिल्ह्यासह राज्यात मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दिवसेंदिवस पाऊस कमी होत चालला असून, पर्यावरणाचा असमतोल वाढत आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी जिंतूर तालुक्यात वेगवेगळ्या मार्गाने नेहमीच प्रयत्न होतात. तालुक्यातील भोगाव येथे ७० एकर परिसरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातूनही वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्याचा निर्णय पुंगळा येथील गणेश भक्तांनी घेतला. त्यातूनच सुमारे चौदाशे रोपांची आरास गणेश मूर्तीसमोर केली आहे. वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखावा, असा संदेश या अभिनव नैसर्गिक देखाव्यातून दिला जात आहे.
या कामी गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश जगताप, ज्ञानेश्वर जगताप, राजेश जगताप, शिवाजी जगताप, विजय जगताप, किरण जगताप, सचिन जगताप, अर्जुन जगताप, विठ्ठल जगताप, राहुल जगताप, एकनाथ जगताप, सचिन कदम, प्रताप कदम, रामचंद्र जगताप, कैलास मोरे आदींनी पुढाकार घेतला आहे.
खर्चाला फाटा देत राबविला उपक्रम
गणेशोत्सव काळात देखाव्याच्या माध्यमातून होणाऱ्या खर्चाला फाटा देत पुंगळा येथील युवकांनी रोपांची आरास करीत पर्यावरणाचा महत्वपुर्ण संदेश जनतेला दिला आहे. विशेष म्हणजे, पिंपळ, वड, चिंच, जांभूळ, सीताफळ, शेवगा, करंजी लिंब ही सावली देणारी आणि पक्ष्यांसाठी उपयुक्त असलेली रोपे याठिकाणी ठेवली आहेत.