परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:54 IST2019-02-05T00:54:43+5:302019-02-05T00:54:58+5:30
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.

परभणी : ‘अग्निशमन’चा रोजंदारी कर्मचाऱ्यांवर डोलारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने केवळ तीन रोजंदारी कर्मचाºयांवर या पालिकेच्या अग्निशमन दलाचा डोलारा आहे.
तालुक्यातील ५२ गावांसह शहराला आगीच्या संभाव्य धोक्यापासून वाचविण्यासाठी २००९ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अन्सारी यांनी पालिकेत अग्निशमन दल उभारण्यात यावे, अशी मागणी करीत शासन दरबारी प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारने ३१ आॅगस्ट २००९ रोजी या प्रस्तावाला मान्यता देत या दलासाठी शासनाने ६४ लाख रुपयांचे अनुदान दिले. पालिकेचे १६ लाख असे एकूण ८० लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आले. यामध्ये वाहनासाठी २८ लाख तर कर्मचारी निवासाकरिता ३६ लाख ८६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. २०१२ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष गणेश कुमावत यांनी पाठपुरावा करून अग्निशमन दलासाठी लागणारे वाहन, यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली. मात्र पालिकेला या दलासाठी लागणाºया कर्मचारी भरतीचे अधिकार दिले नसल्याने तीन रोजंदारी कर्मचाºयांची भरती करून हा विभाग चालवावा लागत आहे. पाच वर्षापासून नगरपरिषद संचालनालयाकडून कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने रोजंदारी कर्मचाºयांनाच हा विभाग सांभाळावा लागत आहे. या कर्मचाºयांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ६ पदे मंजूर आहेत. यामध्ये अग्निशमन अधिकारी-१, चालक- १ , फायरमन ४ या पदांचा समावेश आहे. भरतीला हिरवा कंदील मिळाल्यास पालिकेला प्रशिक्षित कर्मचारी मिळतील. तसेच आगीच्या घटना घडल्यास नियंत्रण मिळविणे सोपे होईल.
राज्यस्तरावर अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरती संदर्भात निर्णय होत नसल्याने भरती प्रक्रिया प्रलंबित आहे. भरती संदर्भात निर्णय झाल्यास योग्य तो पाठपुरावा केला जाईल.
-उमेश ढाकणे,
मुख्याधिकारी, नगरपालिका मानवत,
तालुक्यातील ५२ गावांसह शहराला प्रशिक्षित कायमस्वरुपी कर्मचारी असलेल्या अग्निशमन दलाचा उपयोग होणार आहे. कर्मचारी भरती संदर्भात नगर परिषद संचालनालय महाराष्टÑ राज्य यांच्याकडे जिल्हाधिकाºयांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
-डॉ. अंकुश लाड,
मानवत
शहरात एकूण १४ जिनिंग युनिट आहेत. त्यापैकी १२ सुरू आहेत. या युनिटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या कापसाची खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. प्रशिक्षित कर्मचारी असल्यास आगीवर लवकर नियंत्रण मिळविता येते. यामुळे नुकसान कमी होते.
-गिरीश कत्रुवार, अध्यक्ष जिनिंग असोसिएशन