परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:15 IST2025-03-27T19:11:07+5:302025-03-27T19:15:19+5:30
काही दिवसांपूर्वी क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची पैशांची मागणी करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती

परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात
परभणी : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी स्पर्धेचे देयक काढण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली. यामध्ये लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले.
मानवत येथील एका तक्रारदाराला तिथल्या क्रीडा स्पर्धेचे बिल तसेच स्विमिंग पूलची मान्यता देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाखांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख रुपये पहिल्यांदाच त्यांनी स्वीकारले होते. त्यानंतर उर्वरित रक्कमेची मागणी केल्याने तक्रारदाराने परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने या तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि आज सापळा रचून दीड लाख रुपये स्वीकारताना कविता नावंदे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सध्या त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे.
विधानसभेतही आमदारांनी मांडला होता प्रश्न
काही दिवसांपूर्वी क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची पैशांची मागणी करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती तर एक दिवसापूर्वी आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्यांच्या बडतर्फीची मागणी केली होती. हे प्रकरण ताजे असताना गुरुवारी दुपारी एसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या लाच मागणी प्रकरणात अडकल्या. स्पर्धेचे देयक काढण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे अडीच लाखांची मागणी केली होती.