परभणी जिल्ह्यात वर्षभरात ३७७९ हेक्टर जमीन सिंचनाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 20:32 IST2020-01-17T20:29:31+5:302020-01-17T20:32:18+5:30
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळावे व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने २०१५-१६ पासून देशात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली.

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ३७७९ हेक्टर जमीन सिंचनाखाली
परभणी : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात ११ कोटी २९ लाख ८० हजार रुपये खर्च करुन ३ हजार ७७९.५३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचा अहवाल या विभागाने दिला आहे.
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळावे व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने २०१५-१६ पासून देशात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतास पाण्याची उपलब्ध करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. सद्यस्थितीत या योजनेंतर्गत केंद्र व राज्यशासन ६०:४० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. या योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील नऊही तालुक्यातील ५ हजार ६२१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. त्यामध्ये १ हजार ८६२ शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेचा तर ३ हजार ७५९ लाभार्थ्यांना तुषार सिंचन योजनेचा लाभ देण्यात आला.
यासाठी ठिबक सिंचन योजनेंतर्गत ६ कोटी ९० लाख ९ हजार रुपये आणि तुषार सिंचन योजनेंतर्गत ४ कोटी ३९ लाख ७१ हजार रुपये असे ११ कोटी २९ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात आले. त्याअंतर्गत ठिबक सिंचन योजनेतून जिल्ह्यात १६४७.७२ हेक्टर तर तुषार सिंचन योजनेंतर्गत २१३१.८१ हेक्टर अशी एकूण ३ हजार ७७९.५३ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असल्याचा अहवाल कृषी विभागाच्या वतीने नुकत्याच झालेल्या जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला.
या अहवालानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९३६.८२ हेक्टर जमीन जिंतूर तालुक्यात सिंचनाखाली आल्याचे नमूद करण्यात आले असून त्यावर २ कोटी २६ लाख रुपये खर्च झाला आहे. त्यानंतर सेलू तालुक्यात ५४९.६७ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून यावर १ कोटी ३३ लाख १२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. मानवत तालुक्यात १ कोटी ९१ लाख २१ हजार रुपये या योजनेवर खर्च झाले असून त्यातून ५४१.१२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यात ३४ लाख ६१ हजार रुपये खर्च झाला असून या तालुक्यातील १२६.७२ हेक्टर तर पालम तालुक्यातील २५४.५८ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. यावर ९९ लाख ४४ हजार रुपये खर्च झाला आहे.
परभणी तालुक्यात ६४५.१० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून यावर १ कोटी ७३ लाख ६ हजार रुपये खर्च झाले आहेत. पाथरी तालुक्यात ३०७.६६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून यावर १ कोटी ३३ लाख ५१ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. पूर्णा तालुक्यात २८९.४४ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून त्यावर ९६ लाख ५३ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. सोनपेठ तालुक्यात १२८.४२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून त्यावर ४२ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.
जिंतूर तालुका : सर्वाधिक शेतकऱ्यांना लाभ
या योजनेचा जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ५६७ जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्या खालोखाल परभणी तालुक्यातील १००९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून मानवत तालुक्यात ७२७, गंगाखेड तालुक्यातील २१३. पालम तालुक्यातील ३८२, पाथरी तालुक्यातील ४०१, पूर्णा तालुक्यातील ४७२, सेलू तालुक्यातील ६८७ आणि सोनपेठ तालुक्यातील १६३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
या योजनेंतर्गत असे मिळते अनुदान
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ६० टक्के तर याच क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान मिळते. अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारकांना ४५ टक्के तर याच क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारकांना शासनाकडून ३५ टक्के अनुदान देण्यात येते.