परभणी: डिझेलअभावी थांबली एस.टी. बसची चाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:00 IST2019-03-13T23:59:43+5:302019-03-14T00:00:31+5:30
येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.

परभणी: डिझेलअभावी थांबली एस.टी. बसची चाके
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
एस.टी. महामंडळाच्या परभणी येथील आगारातून दररोज शेकडो बसेस ग्रामीण भागातील वेगवेगळ्या मार्गावर धावतात. या बसेसना परभणी आगारातूनच डिझेलचा पुरवठा केला जातो. सोमवारी सायंकाळी आगारातील डिझेलचा साठा संपत आल्याने आॅनलाईन पद्धतीने डिझेलची नोंदणी करण्यात आली. मात्र डिझेल घेऊन येणारा टँकर बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणी आगारात पोहोचला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या आगारातील डिझेलचा साठा संपला. त्यामुळे ग्रामीण भागात बस घेऊन जाणाऱ्या चालक आणि वाहकांना डिझेल उपलब्ध झाले नाही. परिणामी बसगाड्या जागेवरच उभ्या करण्यात आल्या. परभणीतून आगारातून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ४ मार्गावरील बसफेºया रद्द झाल्या. सुमारे ५०० कि.मी. अंतरावर बसेस धावल्या नाहीत. तर बुधवारी देखील हीच समस्या उद्भवली. सकाळी ७ वाजेपासून आगारातून ग्रामीण भागात बसफेºया सोडल्या जातात. मात्र डिझेल नसल्याने बुधवारी देखील बसेस धावल्या नाहीत. त्यामुळे सकाळपासून चालक-वाहक आगारात ठाण मांडून बसले होेते. बुधवारी दिवसभरात १० बसफेºया रद्द झाल्या असून, साधारणत: १ हजार कि.मी. प्रवासाचा फटका महामंडळाला सहन करावा लागला.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डिझेलचे टँकर आगारात दाखल झाल्यानंतर डिझेल उतरवून घेण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत झाली. परभणी आगाराच्या या ढिसाळ कारभाराचा फटका ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांना सहन कराव लागला. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील प्रवासी हेच एस.टी. महामंडळाचे मुख्य ग्राहक आहेत. शहरी भागातील बहुतांश प्रवासी रेल्वे, खाजगी वाहतुकीचा पर्याय निवडतात; परंतु ज्या प्रवाशांच्या भरोस्यावर महामंडळ उत्पन्न घेते, त्याच प्रवाशांना वाºयावर सोडल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
आगारप्रमुखांची बघ्याची भूमिका
आगारातील डिझेल संपत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी रात्री जिंतूर आगारातून सुमारे साडेतीन हजार लिटर डिझेल मागवून घेण्यात आले होेते. त्यामुळे मंगळवारी दिवसभराच्या बसफेºया करणे शक्य झाले असते; परंतु आगारप्रमुखांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले नाही. डिझेल उपलब्ध असतानाही संपल्याचे सांगत वाहक आणि चालकांना डिझेल देण्यात आले नाही. जिंतूरहून आणलेले डिझेल बसगाड्यांमध्ये भरायचे कोणी? असा प्रश्न होता. त्यामुळे हे डिझेल वापरलेच नाही. परिणामी हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. आगार प्रमुखाच्या या भोंगळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
पैसे नसल्याने ओढवला प्रसंग
एस.टी. महामंडळाच्या परभणी आगाराच्या इतिहासात प्रथमच डिझेलसाठी पैसे नसल्याने वेळेत डिझेल खरेदी करता आले नाही. परिणामी डिझेलअभावी बसेस धावल्या नसल्याचे समोर आले आहे. परभणी आगाराला दोन दिवसांना १२ हजार लिटर डिझेल लागते. जवळपास ८ लाख ८४ हजार रुपये भरल्यानंतर डिझेल उपलब्ध होते. मात्र सोमवारी आगारात डिझेलसाठी पैसे उपलब्ध नसल्याने वेळेत डिझेलची नोंदणी झाली नाही. त्यामुळेच बसफेºया रद्द करण्याची वेळ आगारावर ओढावली.