परभणीत दिवसाढवळ्या रक्ताचा सडा! नांदखेडा रोडवर रिक्षा चालकाची गळा चिरून निर्घृण हत्या
By राजन मगरुळकर | Updated: February 14, 2026 18:52 IST2026-02-14T18:51:50+5:302026-02-14T18:52:50+5:30
रिक्षात पाठीमागून वार अन् जागीच मृत्यू; पोलीस अधीक्षकांसह ताफा घटनास्थळी

परभणीत दिवसाढवळ्या रक्ताचा सडा! नांदखेडा रोडवर रिक्षा चालकाची गळा चिरून निर्घृण हत्या
परभणी : ऑटो रिक्षा चालक असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा गळ्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना नांदखेडा रोड भागात सोमनाथ नगर पाटी जवळ घडली. शनिवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान परिसरातील काही ग्रामस्थांना पाटीजवळ एक मृतदेह आढळला यानंतर ही माहिती नानलपेठ पोलिसांना देण्यात आली.
सय्यद अकबर सय्यद गफूर (४५, रा. पाकीजा मोहल्ला, जुना जिल्हा परिषद इमारतीच्या समोर) असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे. सय्यद अकबर सय्यद गफूर हे मागील अनेक वर्षांपासून रिक्षा चालक म्हणून काम करतात. (एमएच २२ एपी १८५२) हा त्यांचा ऑटो असून शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नांदखेडा रोड भागात सोमनाथ नगरच्या पाटीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. ऑटोमध्येच पाठीमागून कुणीतरी चालक सय्यद अकबर यांच्या मानेवर गळ्यावर चाकूने किंवा धारदार शस्त्राने वार केला व यातच त्यांचा मृत्यू झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, गणेश कदम, सचिन बेंद्रे, उपनिरीक्षक बिक्कड, खजे याच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट दिली.
मयताचा मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी भेट दिली व मयताच्या नातेवाईक कुटुंबासोबत संवाद साधला. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंद झाला नाही. जिल्हा रुग्णालयात एमएलसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मयत ऑटो चालक सय्यद अकबर सय्यद गफूर यांच्या पश्चात दोन भाऊ असा परिवार आहे. सय्यद अकबर सय्यद गफूर हे अनेक वर्षांपासून ऑटो चालवित होते.