रजेवरील कर्मचाऱ्यांचे ७५ लाख हडपले! परभणीत पशुधन पर्यवेक्षकाचा अजब घोटाळा उघड

By राजन मगरुळकर | Updated: February 27, 2026 18:56 IST2026-02-27T18:54:15+5:302026-02-27T18:56:05+5:30

७५ लाखांचा डल्ला मारणारा 'तो' पर्यवेक्षक पोलिसांच्या जाळ्यात! ५५ लाख केले जमा, तरीही कारवाईचा बडगा कायम

Parbhani Corruption: Livestock Supervisor Arrested for Rs 75 Lakh Fraud by Changing Bank Details | रजेवरील कर्मचाऱ्यांचे ७५ लाख हडपले! परभणीत पशुधन पर्यवेक्षकाचा अजब घोटाळा उघड

रजेवरील कर्मचाऱ्यांचे ७५ लाख हडपले! परभणीत पशुधन पर्यवेक्षकाचा अजब घोटाळा उघड

परभणी : पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन विभाग कार्यालयात कार्यरत पशुधन पर्यवेक्षकाने पदाचा दुरुपयोग करून दोन कर्मचाऱ्यांच्या नावे देय असलेली शासकीय रक्कम त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक बदलून स्वतःच्या बँक खात्यात वळती करून ७५ लाख ९१ हजार ६५५ रुपयांचा अपहार केला. हा प्रकार जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला. याप्रकरणी पशुधन पर्यवेक्षक याच्याविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला.

राजीव माधवराव गावंडे (पशुधन पर्यवेक्षक, पशुसंवर्धन विभाग, पं.स.परभणी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक आयुक्त जगन कुंडलिकराव सोळंके यांनी नानलपेठ ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी पशुधन पर्यवेक्षक राजीव गावंडे हे सन २०१४ पासून कार्यरत असून परभणी तालुक्यातील वर्ग तीन, चार कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्याचे काम नियमित करतात. या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकात तफावत निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या सूचनेनुसार मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी केली. त्यात वेतन देयक तपासणी दरम्यान तफावत झाल्याचे आढळून आले. हा सर्व प्रकार जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला.

यांची रक्कम वळविली स्वतःच्या खात्यात
पशुधन पर्यवेक्षक राजीव गावंडे यांनी तत्कालीन पशुधन पर्यवेक्षक सुचिता शिंदे या परभणी जिल्ह्यातून कार्यमुक्त झाल्यानंतरही त्यांच्या नावे एकूण पाच लाख ७९ हजार ७८२ रुपये व परिचर राजेश पांडुरंग घाडगे हे वैद्यकीय रजेवर असतानाही त्यांच्या नावे एकूण ७० लाख ११ हजार ८७३ रुपये संबंधितांचे असलेले बँक खाते क्रमांक बदलून त्या जागी स्वतःचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नानलपेठ येथील खात्यात ही दोन्हीही रक्कम वळती करून अपहार केल्याचे निदर्शनास आले.

५५ लाख शासन खाती केले जमा
या प्रकरणात सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्यासह संबंधित विभागाने राजीव गावंडे यांच्याकडील ५५ लाख ५५ हजार ४४ रुपये चलनाद्वारे शासन खात्यात जमा केले आहेत. उर्वरित २० लाख ३६ हजार ६११ रुपये रक्कम बाकी आहे. नमूद आरोपी राजीव गावंडे यास पोलिसांनी अटक केली असून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात अजून सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title : परभणी: छुट्टी पर कर्मचारियों के पैसे पशुधन पर्यवेक्षक ने हड़पे।

Web Summary : परभणी में पशुधन पर्यवेक्षक ने छुट्टी पर गए कर्मचारियों सहित दो कर्मचारियों के 75.91 लाख रुपये अपने खाते में डालकर गबन किया। पुलिस ने पर्यवेक्षक को गिरफ्तार कर 55.55 लाख रुपये बरामद किए। आगे की जांच जारी है।

Web Title : Parbhani livestock supervisor embezzles funds meant for employees on leave.

Web Summary : Livestock supervisor in Parbhani siphoned ₹75.91 lakh meant for two employees, including those on leave, by diverting funds into his account. Police arrested the supervisor, recovering ₹55.55 lakh. Further investigation is underway.