परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:49 IST2018-09-26T00:47:43+5:302018-09-26T00:49:00+5:30
एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

परभणी : एक लाख रोपे करपण्याच्या स्थितीत
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जून महिन्यामध्ये तालुक्यात ६४ ग्रामपंचायतींतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, रस्ते, स्मशानभूमी आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभागाने तालुक्यात सुमारे एक लाख झाडे लावली. दरवर्षी वृक्ष लागवड योजना राबविली जाते. मात्र संवर्धनासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.
त्यामुळे वर्षानुवर्षापासून गाजावाजा करून केवळ अभियान राबविले जात असून वृक्षांचे संवर्धन मात्र होत नाही. यावर्षी या योजनेत निसर्गानेही खोडा घातला आहे. तालुक्यात एक महिन्यापासून पाऊस झाला नसल्याने लावलेली झाडे वाळत आहेत. त्यामुळे या अभियानाचाच बोजवारा उडण्याची स्थिती पालम तालुक्यात निर्माण झाली आहे.
लोकसहभाग मिळूनही यंत्रणेचे दुर्लक्ष
तालुक्यातील आरखेड, पेठशिवणी व कापसी ग्रामपंचायतींनी प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे १५ हजार रोपांची लागवड लोकसहभागातून केली. यासाठी ५० ते १ लाख रुपयांची पदरमोडही ग्रामस्थांनी केली. मात्र वृक्ष संगोपन करताना ग्रामपंचायतीची दमछाक होत आहे. निधी नसल्याने झाडांना पाणी घालणे, कुंंपन लावणे, काठीचा आधार देणे ही कामे ठप्प पडली आहेत. लोकसहभागातून लावलेली रोपे जगावीत यासाठी सरपंच, उपसरपंच प्रयत्न करीत असले तरी प्रशासकीय पातळीवर सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.