परभणी शहर : रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:29 AM2019-08-10T00:29:10+5:302019-08-10T00:29:35+5:30

राष्ट्रीय हरित लवादाने सर्व महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवाने देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले असले तरी परभणी शहरात मात्र या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदावरच दिसून येत आहे.

Parbhani City: Rainwater Harvesting forced on paper | परभणी शहर : रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदावरच

परभणी शहर : रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदावरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रीय हरित लवादाने सर्व महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवाने देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले असले तरी परभणी शहरात मात्र या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती कागदावरच दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होत चालले आहे. त्यामुळे पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, या उद्देशाने २०१४ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये बांधकाम परवानगी देत असताना जल पूनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे बंधनकारक करावेत, असे आदेश दिले होते. राज्याच्या नगरविकास विभागाने तसे आदेशही महानगरपालिकांना दिले होते; परंतु, या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी परभणीत होत नसल्याची बाब समोर आली आहे. शहरात २०१४-१५ ते २०१८-१९ या पाच वर्षाच्या कालावधीत २ हजार १७५ बांधकामे परवाने देण्यात आले. त्यातील बहुतांश नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणाच उभारली नाही. विशेष म्हणजे परभणी महानगरपालिकेने बांधकाम परवानगी दिल्यानंतर संबंधितांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारली की नाही, याची पडताळणी करणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे मनपाकडे याबाबतची एकत्र नोंद नाही.
आॅनलाईन परवान्यानंतरही झाली नाही सुधारणा
४राज्य शासनाने महानगरपालिकांना १ आॅगस्ट २०१८ पासून बांधकाम परवाने आॅनलाईन देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार परभणी महानगरपालिकेने १ आॅगस्ट २०१८ ते २६ मार्च २०१९ या कालावधीत १८२ नागरिकांना आॅनलाईन बांधकाम परवाने दिले. हे परवाने देत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाईल, असे आश्वासन नागरिकांनी दिले होते; परंतु, त्याची पूर्तता झाली की नाही, याची पडताळणी केली गेली नाही.
४परिणामी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेश अंमलबजावणीला खो मिळाला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेची परवानगी घेऊन बांधकाम करण्यापेक्षा परवानगी न घेताच बांधकाम करण्याचे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या प्रकाराला आळा घालण्यात मनपा अपयशी ठरली असून या माध्यमातून मनपाचे उत्पन्नही बुडत आहे. असे असताना मनपा संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याबाबतही हतबल दिसून येत आहे.
५० हजार घरांचे उद्दिष्ट
परभणी शहरात ७० हजार मालमत्ता आहेत. त्यापैकी ५० हजार घरांनी येत्या वर्षभरात जल पूनर्भरण केले पाहिजे. या उद्देशानेच मनपा काम करणार आहे. तसे उद्दिष्ट मनपाने ठेवले आहे. यासाठी महानगरपालिकेकडून पाहणी केली जाणार असून ज्यांनी जलपूर्भरण केले नाही, त्यांना विशिष्ट कालावधी दिला जाणार आहे. तसे न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.- रमेश पवार, आयुक्त,मनपा
जलपूनर्भरण काळाची गरज
दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चालले आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जावू न देता ते जमिनीमध्ये मुरले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आणि शासकीय कार्यालयांनी त्यांच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. असे केले तरच भविष्यकाळात पाणीटंचाईवर मात करता येईल. अन्यथा सर्वांनाच गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल. - संजय ठकारे, जलतज्ज्ञ

Web Title: Parbhani City: Rainwater Harvesting forced on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.