परभणी : बेरोजगारांना फसविणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:12 AM2019-03-03T00:12:34+5:302019-03-03T00:12:54+5:30

जालना येथील जिल्हा परिषदेमध्ये लिपीक पदाची नोकरी लावतो म्हणून ७ लाखांचे अमिष दाखवून बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या प्रकरणात फिर्यादीकडून तीन हजार रुपये घेऊन फसवणूकही करण्यात आली. दरम्यान, या आरोपीने इतर जिल्ह्यातही फसवणूक केली असावी, अशी शंका पोलिसांनी वर्तविली आहे.

Parbhani: The casualty of the unemployed | परभणी : बेरोजगारांना फसविणारा गजाआड

परभणी : बेरोजगारांना फसविणारा गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जालना येथील जिल्हा परिषदेमध्ये लिपीक पदाची नोकरी लावतो म्हणून ७ लाखांचे अमिष दाखवून बनावट नियुक्ती आदेश देणाऱ्या भामट्यास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या प्रकरणात फिर्यादीकडून तीन हजार रुपये घेऊन फसवणूकही करण्यात आली. दरम्यान, या आरोपीने इतर जिल्ह्यातही फसवणूक केली असावी, अशी शंका पोलिसांनी वर्तविली आहे.
तालुक्यातील जोड परळी येथील सुंदर उत्तम काळे यांच्या फिर्यादीवरुन २ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. काळे यांना आरोपीने त्यांचे नाव जाधव असल्याचे सांगून स्वत: जालना येथील पशू वैद्यकीय अधिकारी कार्यालयात नोकरीला असल्याचे सांगितले होते.
सध्या विविध विभागामध्ये लिपिक पदाची भरती सुरु असून तुमच्या मुलाला नोकरी देऊ शकतो. मंत्रालयामध्ये आपले नातेवाईक काम करतात. त्यांच्या माध्यमातून नियुक्ती आदेश दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावर विश्वास ठेवून सुंदर काळे यांनी २० फेब्रुवारी रोजी मुलाच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीही त्यांना दिल्या. तसेच २ हजार रुपये दिले. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी जाधव नामक या व्यक्तीने तुमचे काम झाले, असे सांगितले. त्यावेळी जिंतूर येथील शेख रफीक शेख रशीद यांची लिपीक पदावर नियुक्ती केल्याची बंद लिफाफ्यातील आॅर्डर दाखवून काळे यांचा विश्वास संपादन केला व त्यांच्याकडून आणखी १ हजार रुपये घेतले.
पुढील पैशांची तडजोड करुन ठेवा, असे जाधव याने काळे यांना सांगितले. २५ फेब्रुवारी रोजी मुलाच्या मित्राच्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर जालना जि.प. येथे नियुक्ती झालेल्या आदेशाची प्रत पाठविली. हा नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर तो बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने काळे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन घेतला आहे.
आरोपीकडून बनावट आॅर्डरही हस्तगत
४गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने या प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेतले. तेव्हा अरविंद शेषराव पौळ (रा.खंडाळी जि.लातूर) असे आरोपीचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. अरविंद पौळ याने जिंतूर, जालना व इतर ठिकाणच्या उमेदवारांना नोकरीचे अमिष दाखवून खोट्या सही-शिक्क्याच्या बनावट आॅर्डर तयार करुन पैसे उकळण्याचे प्रयत्न केले होते, अशी माहिती मिळाली असून बनावट आॅर्डरही त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत, असे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक प्रवीण मोरे यांनी सांगितले.
४ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुधकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवाड, लक्ष्मीकांत धुतराज, संजय शेळके, भगवान भुसारे, हरि खुपसे, परमेश्वर शिंदे, यशवंत वाघमारे यांनी केली.
विद्यापीठात सोडवून घेतला होता पेपर
४या प्रकरणातील आरोपीने सुंदर काळे यांच्या मुलाकडून शहरातील विद्यापीठ परिसरात एका झाडाखाली बसून पेपरही सोडवून घेतला होता. विशेष म्हणजे त्यावर अनुक्रमांक, नाव, सही घेऊन विश्वास बसावा म्हणून त्याच दिवशी शेख रफीक शेख रशीद यांचा बनावट नियुक्ती आदेशही दाखविला होता. काळे यांना दिलेल्या नियुक्ती आदेशावर जालना जि.प. येथील लिपीक पदावर नियुक्ती झाल्याचा हुबेहुब शासकीय लिफाफ्यातील आॅर्डर दिली होती. बनावट शिक्के, शासकीय मुद्रा वापरण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.
बेरोजगार उमेदवारांनी अशा बोगस नियुक्ती आदेश देणाऱ्यांवर विश्वास न ठेवता अमिषाला बळी पडू नये. कुठलेही शासकीय आदेश त्रयस्थ व्यक्तीमार्फत दिले जात नाहीत. त्यामुळे अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केले आहे.

Web Title: Parbhani: The casualty of the unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.