परभणीत एटीएसने पकडला बारा लाखांचा चोरीचा माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:54 IST2019-12-09T19:52:22+5:302019-12-09T19:54:04+5:30
दहशतवादविरोधी पथकाने ७ डिसेंबर रोजी रात्री एका ट्रकमधून माल जप्त केला

परभणीत एटीएसने पकडला बारा लाखांचा चोरीचा माल
परभणी : येथील दहशतवादविरोधी पथकाने ७ डिसेंबर रोजी रात्री एका ट्रकमधून १२ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ खोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ७ डिसेंबर रोजी भंगार विक्रेत्यांची चौकशी केली. त्यावेळी खंडोबा बाजारातील अहिल्याबाई होळकर चौकात न्यू बॉम्बे स्क्रॅप या दुकानात एका ट्रकमध्ये (एपी १२/यु ०५८६) तांब्याचे बंडल टाकले जात असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या मालाविषयी चौकशी केली असता, तो चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी तीन टन तांब्याच्या पट्ट्या जप्त केल्या आहेत.
या तांब्याची किंमत १२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार भारत नलावडे यांच्या फिर्यादीवरुन शेख अजमत अली शेख मजहर अली (३८, जिजामाता रोड, परभणी) आणि ट्रक चालक गणेश नारायण मिरासे (४५, रा.शिरडशहापूर ता.औंढा, जि. हिंगोली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हवालदार राजेश्वर पाटील तपास करीत आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विश्वास कोल्हे, भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाणे, अजहर पटेल, दीपक मुदिराज, सुधीर काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.