Parbhani: Abduction of students from Gangakhed | परभणी: गंगाखेडमधून विद्यार्थ्यांचे अपहरण

परभणी: गंगाखेडमधून विद्यार्थ्यांचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शहरातील डॉक्टरलेन भागातील खाजगी वसतिगृहातील दोन शाळकरी मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी शुक्रवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगाखेड शहरातील डॉक्टरलेन परिसरात असलेल्या खाजगी वसतिगृहातील समाधान भास्कर ठवरे (१५, रा़ आनंदवाडी ता़ पालम) व जनार्धन शिवाजी साबळे (१५, रा़ धनेवाडी ता़ पालम) हे दोघे २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७़२५ वाजता शाळेत जाण्यासाठी वसतिगृहातील रजिस्टरला नोंद करून बाहेर गेले़ शाळा सुटल्यानंतर दुपारी २ वाजता ते वसतिगृहात परत आले नसल्याने व्यवस्थापक विजेश सूर्यकांत बाबर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या शाळेत तसेच त्यांच्या पालकांना फोन करून मुले गावाकडे आले आहेत का? याबाबत विचारणा केली़ मात्र दोन्ही मुले गावाकडे आले नाहीत, असे पालकांनी सांगितल्याने मुलांच्या नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला; परंतु, दोन्ही मुले मिळून आली नसल्याने वसतिगृहाचे व्यवस्थापक विजेश बाबर यांनी २२ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात कारणावरून दोन्ही मुलांना पळून नेल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे हे तपास करीत आहेत़

Web Title: Parbhani: Abduction of students from Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.