परभणी : पालममधील ६४ गावांचा पाणीप्रश्न लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:12 IST2019-01-30T00:11:08+5:302019-01-30T00:12:56+5:30
शहरासह तालुक्यातील ६४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. शासनाने लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असून ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परभणी : पालममधील ६४ गावांचा पाणीप्रश्न लागणार मार्गी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): शहरासह तालुक्यातील ६४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. शासनाने लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असून ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात मंगळवारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. रोकडे म्हणाले, मार्च महिना सुरु होताच तालुक्यात पाणीटंचाई सुरु होते. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे ६४ गाव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला होता. शासनाने ५४ कोटी रुपयांची लिंबोटी धरण ते पालम शहरासह ६४ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ३१ जानेवारी रोजी या योजनेचे भूमिपूजन होणार असून या योजनेमुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे, असे गणेशराव रोकडे यांनी सांगितले. यावेळी डॉ.रामराव उंदरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, नगरसेवक गजानन रोकडे, विश्वंभर बाबर, डॉ.बडेसाब शेख आदी उपस्थित होते.