परभणी : हेक्टरी २० हजारांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 11:32 PM2019-11-24T23:32:28+5:302019-11-24T23:32:49+5:30

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाने देऊ केलेल्या मदतीनंतरही उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरासरी २० हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत असून आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी होत आहे़

Parbhani: 3 thousand hectare / ha | परभणी : हेक्टरी २० हजारांचा फटका

परभणी : हेक्टरी २० हजारांचा फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी शासनाने देऊ केलेल्या मदतीनंतरही उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सरासरी २० हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत असून आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी होत आहे़
आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली़ दोन आठवडे हा पाऊस बरसला़ अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने नदी-नाल्यांना पूर येऊन पिकांचे नुकसान झाले़ यावर्षी जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाचे पीक तरारून आले होते़ विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यातच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून ठेवली होती़ तर शेतात उभे असलेले पीक काढणीच्या तयारीत होते़ या परिस्थितीत अतिवृष्टीने जिल्ह्यात हाहाकार माजविला़ ओढे आणि नाल्यांना आलेल्या पुरामध्ये अनेक शेतकºयांचे सोयाबीन पाण्यात वाहून गेले़ त्याच प्रमाणे शेतात उभे असलेले आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे जागेवरच नुकसान झाले़ काढून ठेवलेल्या सोयाबीनलाही मोड फुटू लागले़ तर शेतातील उभे सोयाबीन काळवंडून गेले़ जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सोयाबीनचा पेरा वाढला आहे़ कापसाच्या बरोबरीने या पिकाला नगदी पीक म्हणून ओळख मिळू लागली आहे़ याच पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला़ विमा नुकसान भरपाई संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही़ परंतु, महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर राज्य शासनाने जिरायती पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे़ ही मदत तुटपुंजी आहे़ जाहीर केलेल्या मदतीपैकी केवळ २५ टक्के रक्कम सद्यस्थितीला जिल्ह्याला प्राप्त झाली़
सोयाबीन पिकाच्या उत्पादनाचा खर्च पाहता निम्मीही मदत शेतकºयांच्या हाती पडत नाही़ सर्वसाधारणपणे सोयाबीन पिकाचा जिल्ह्यातील उतारा लक्षात घेता प्रती हेक्टरी १५ क्विंटल सोयाबीन शेतकºयांच्या हातात पडते़ या सोयाबीनला बाजारभावाप्रमाणे ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव गृहित धरला तर हेक्टरी ४५ हजार रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हातात या हंगामातून मिळते़ अनेक शेतकºयांचे सोयाबीन वाहून गेले आहे़ परंतु, ज्यांचे पीक काळवंडले ते सोयाबीन देखील बाजारात येत आहे़ त्याला २ हजार रुपयांपर्यंतचा प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे़ तर शासनाकडून ८ हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे़ या सर्व पैशांची गोळाबेरीज केली असता, शेतकºयांना हेक्टरी २० हजार रुपयांचा फटका आजघडीला सहन करावा लागत आहे़ त्यामुळे शासनाने जिरायती पिकांसाठी किमान २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी होत आहे़
कापूस उत्पादनातही आर्थिक झळ
४खरीप हंगामातील कापसाचेही अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे़ शेतात उभा असलेल्या कापसाला जागेवरच कोंब फुटले़ तसेच कापूस पिवळा पडला़ शेतात साचलेल्या पाण्याचा वेळेत निचरा झाला नाही़
४त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला़ अशाही परिस्थितीत हाती आलेल्या कापसातून कमी अधिक प्रमाणात उत्पन्न मिळत आहे़ परंतु, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जिल्ह्यात प्रतीहेक्टरी ३० क्विंटल कापसाचा उतारा येतो़ त्याला सरासरी ५ हजार रुपयांचा भाव जरी मिळाला तरी एका हेक्टरमध्ये साधारणपणे दीड लाख रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हाती पडते़ या उत्पन्नातील पिकावरील सुमारे ५० हजार रुपयांचा लागवडीचा खर्च वगळला तर १ लाख रुपयांचे उत्पन्न एका हंगामात मिळते़
४यावर्षी कापूस पिकासाठीही हेक्टरी केवळ ८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे़ उतारा घटल्याने निघालेल्या कापसातून ३० ते ४० हजार रुपये हेक्टरी शेतकºयांच्या हाती पडतीलही; परंतु, या अतिवृष्टीमुळे शेतकºयांना हेक्टरी सरासरी तब्बल ५२ हजार रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे़
तुटपुंजी मदत जिल्ह्याला प्राप्त
जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीपोटी प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख रुपयांची मागणी केली आहे़ या मागणीच्या तुलनेत जिल्ह्याला २५ टक्के म्हणजे ८७ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या निधीचे शेतकºयांना वाटप सुरू झाले आहे़ सध्या तालुकास्तरावर शेतकºयांच्या याद्या तयार केल्या जात असून, थेट बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे़ परंतु, नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या, नुकसानीचा आकडा आणि मिळालेली मदत पाहता शेतकºयांना आर्थिक मदत देताना प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागणार आहे़ सध्या रबी हंगामाची लगबग सुरू झाली असून, राज्य शासनाने मागणी प्रमाणे रक्कम त्वरित वितरित करावी, तसेच वाढीव मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: 3 thousand hectare / ha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.