परभणी : ‘जलशुद्धीकरण’चे पंचवीस वर्षानंतर अद्ययावतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:00 IST2019-01-07T23:59:31+5:302019-01-08T00:00:03+5:30
पालिकेला प्राप्त झालेल्या विकास निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून यामुळे शहरातील नागरिकांना आगामी काळात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.

परभणी : ‘जलशुद्धीकरण’चे पंचवीस वर्षानंतर अद्ययावतीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : पालिकेला प्राप्त झालेल्या विकास निधीतून जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून यामुळे शहरातील नागरिकांना आगामी काळात पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाथरी रस्त्यावर २५ वर्षापूर्वी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत होते. २० ते २५ वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे अद्यावतीकरण करण्यात आलेले नव्हते. या प्रकल्पाच्या दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी निधी प्राप्त झाला आहे. २७ डिसेंबरला या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी वाळू बदलण्यात आली नव्हती. ही वाळू बदलण्यात येणार आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्वी आणि नंतरच्या प्रक्रिया करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री बदलण्यात येणार आहे. नवीन प्लोकलेक्टर बसविण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत ब्रिजचे काम नव्याने करण्यात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेली आॅक्सिमॅक्स मशिनसह क्लोरिंग सिलेंडर बदलण्यात येणार आहे. त्यामुळे जलसुध्दीकरण प्रकल्पच अद्ययावत करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. शहराची लोकसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. पाणी शुद्ध मिळावे, अशी मागणी होती. पालिकेकडून आता ही मागणी पूर्ण होणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, डॉ.अंकुश लाड, अभियंता शेख अन्वर, बंडू सोरेकर यांनी नुकतीच प्रकल्पाची पाहणी केली आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष राणी अंकुश लाड यांनी दिली.