Parabhani: रस्त्यासाठी गाव विक्रीला; टाकळवाडी ग्रामस्थांची गांधीगिरी, इतर गावांत लावले बॅनर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:48 IST2025-11-08T12:47:10+5:302025-11-08T12:48:43+5:30
गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ते पांगरी फाटा हा दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.

Parabhani: रस्त्यासाठी गाव विक्रीला; टाकळवाडी ग्रामस्थांची गांधीगिरी, इतर गावांत लावले बॅनर!
गंगाखेड (जि. परभणी) : गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ते पांगरी फाटा या दीड किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी टाकळवाडीकरांना प्रशासनासोबत मागील अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. मात्र, केवळ आश्वासनांची खैरात मिळत असल्याच्या निषेधार्थ टाकळवाडीकरांनी अख्ये गावच विक्रीला काढले आहे. या गावविक्रीचे बॅनर परिसरातील गावामध्ये लावण्यात आल्याने तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
तालुक्यातील टाकळवाडी ते पांगरी फाटा हा दीड किलोमीटरचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. टाकळवाडीकरांनी वारंवार निवेदने दिली. लोकप्रतिनिधी, प्रशासनाला विनवण्या केल्या. मात्र, टाकळवाडीकरांना न्याय भेटता भेटेना. या सर्व प्रकारांना कंटाळून टाकळवाडीकरांनी विविध आंदोलन केले. अखेर गंगाखेड तालुका पंचायत समिती प्रशासनाकडून पुन्हा एकदा टाकळवाडीकरांना १६ ऑक्टोबरपासून संबंधित काम सुरू करू म्हणून लेखी आश्वासन मिळाले. मात्र, मुदत संपूनही मात्र पदरी पडली ती निराशाच. प्रशासनाकडून मिळत असलेल्या आश्वासनांच्या खैरातीला अखेर टाकळवाडीकर संतापले आहेत. याच संतापातून टाकळवाडीकरांनी राणीसावरगाव व टाकळवाडी परिसरात चक्क बॅनरबाजी करीत गाव विकणे आहे, या आशयाचे फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर तरी प्रशासन जागे होईल अशी अपेक्षा टाकळवाडीकर ठेवून आहेत.
रस्त्यासाठी केली विविध आंदोलने
दीड किमी रस्त्यासाठी केवळ आश्वासन दिले जात असल्याने टाकळवाडीकरांनी १७ ऑगस्टला चिखलामध्ये अर्धनग्न आंदोलन केले. १८ ऑगस्टला प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. १९ ऑगस्टला हलगी यात्रा काढत २० ऑगस्टला भजन आंदोलन केले. अखेर गंगाखेड तालुका पंचायत समिती प्रशासनाकडून पुन्हा एकदा टाकळवाडीकरांना १६ ऑक्टोबरपासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, मुदत संपूनही मात्र पदरी निराशाच पडल्याने ग्रामस्थांनी गाव विक्रीचा पवित्रा घेतला.
इतर गावांत गाव विक्रीचे बॅनर
टाकळवाडीकर ग्रामस्थांनी गाव परिसरासह शेजारच्या राणीसावरगावातही टाकळवाडी गाव विकणे आहे. दीड किलोमीटर पांगरी फाटा ते टाकळवाडी रस्त्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने करूनही प्रशासनाकडून काम सुरू करण्यात न आल्याने गाव विक्रीस काढले असल्याचे बॅनर लावण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.