परभणीत भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी पळविला दुकानातील ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 13:22 IST2018-03-30T13:22:52+5:302018-03-30T13:22:52+5:30
शहरातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानातील मोबाईल, एल.ई.डी. टीव्ही, ए.सी. असा लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

परभणीत भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी पळविला दुकानातील ऐवज
परभणी : शहरातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानातील मोबाईल, एल.ई.डी. टीव्ही, ए.सी. असा लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. पोलीस ठाण्याला लागूनच असलल्या सुपरमार्केट भागात ही घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी, शहरातील लोकमान्यनगरातील रहिवासी हरिपाल मिश्रा यांचे सुपरमार्केट भागात इलेक्ट्रीकल शॉप आहे. मिश्रा यांनी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान बंद केले. रात्री मिश्रा यांच्या शेजारी असलेल्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि भिंतीला छिद्र पाडून मिश्रा यांच्या दुकानात प्रवेश केला. दुकानातील विक्रीला ठेवलेले मोबाईल, एल.ई.डी. टी.व्ही., साऊंड सिस्टीम, दोन ए.सी. आणि १२ ते १४ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. तसेच ठसे तज्ञांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मिश्रा यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सुपरमार्केटमध्ये चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.