Parabhani: दूध सांडल्याचे कारण, पतीने आवळला पत्नीचा गळा; पूर्णा तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:20 IST2025-09-09T18:19:38+5:302025-09-09T18:20:22+5:30
किरकोळ कारणाने हा प्रकार घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Parabhani: दूध सांडल्याचे कारण, पतीने आवळला पत्नीचा गळा; पूर्णा तालुक्यातील घटना
- गजानन नाईकवाडे
ताडकळस (जि.परभणी) : पत्नीने दूध सांडल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीला घरी व शेतात काठी तसेच दस्तीने तिचा गळा आवळून जीवे मारले. ही धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातील बलसा येथे सोमवारी दूपारी घडली. याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात पतीविरुध्द मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल झाला. यातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, सुनिताबाई देविदास शिंदे (४५, शेती,घरकाम, रा,बलसा) असे मयत महिलेचे नाव आहे. पूर्णा तालुक्यातील बलसा येथे देविदास शिंदे (५०) हे कुटुंबासह राहतात. ८ सप्टेंबरला मयत सुनीताबाई शिंदे यांच्याकडून दूध सांडले असता पती देविदास शिंदे याने तिला ८ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान घरी व नंतर पत्नी शेतात गेली असता तिला काठीने व दस्तीने तिचा गळा आवळून जीवे मारले. यानंतर ही बाब सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
यानंतर घटनास्थळी ताडकळसचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, सुजलोड, वाहन चालक साळवे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट दिली. याबाबत मयताचा मुलगा सुरेश देविदास शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती व वडिल देवीदास शिंदे याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास ताडकळस ठाण्याचे सपोनि. गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन काठेवाडे करीत आहेत. किरकोळ कारणाने हा प्रकार घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मयताच्या पश्चात सासू, तीन मुले असा परिवार आहे.