Parabhani: घरकुल योजनेत सेलू पॅटर्न; दलालांची सुटी, 'क्यूआर' स्कॅन करा अन् हप्ता मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:17 IST2025-10-11T16:16:39+5:302025-10-11T16:17:07+5:30
घरकुल लाभार्थ्यांना आता घरी बसून मिळणार हप्ता; सेलू पंचायत समितीचा अभिनव उपक्रम

Parabhani: घरकुल योजनेत सेलू पॅटर्न; दलालांची सुटी, 'क्यूआर' स्कॅन करा अन् हप्ता मिळवा
सेलू (जि. परभणी) : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा दोनअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि दलालांच्या हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी सेलू पंचायत समितीकडून अभिनव तंत्रज्ञानाधारित उपक्रम राबविण्यात आला. राज्यात प्रथमच सेलू पंचायत समिती पातळीवर घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष क्यूआर कोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
सेलू पंचायत समितीअंतर्गत ८२ ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (टप्पा दोन) सुरू आहे. या योजनेंतर्गत १३ हजार ३३६ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. पहिला हप्ता १५ हजार मिळालेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यांसाठी थेट संपर्क साधता यावा, यासाठी क्यूआर कोड प्रणाली विकसित केली आहे. हा उपक्रम गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. या माध्यमातून लाभार्थी घरी बसूनच पंचायत समितीकडे मोबाइलद्वारे माहिती सादर करू शकतात. कामाच्या टप्प्यानुसार मिळणारा अनुदानाचा हप्ता वेळेत प्राप्त करू शकतात.
क्यूआर कोडचा वापर असा
लाभार्थी आपल्या मोबाइलवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपले नाव, ग्रामपंचायत, मोबाइल क्रमांक, घरकुलाचे बांधकाम टप्पे (पाया, बांधकाम, शौचालय पूर्णत्व इ.) याची माहिती भरतात. त्यानंतर संबंधित टप्प्याचा हप्ता निवडून घरकामाचे फोटो अपलोड करून सबमिट केले की ती माहिती थेट घरकुल विभागापर्यंत पोहोचते. संबंधित अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात ऑनलाइन पाठवली जाते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
बुधवारी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते क्यूआर कोडचा शुभारंभ करण्यात आला. ही प्रणाली राज्यातील इतर पंचायत समित्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
पहिल्याच दिवशी उत्साहवर्धक प्रतिसाद
या प्रणालीचा शुभारंभ होताच पहिल्याच दिवशी ११७ लाभार्थ्यांनी क्यूआर कोडद्वारे आपली माहिती भरली. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विस्तार अधिकारी अमोल माटकर, वरिष्ठ सहायक प्रतीक चव्हाण, डाटा ऑपरेटर दिगंबर जाधव, अभियंते कैलास अभोरे, गजानन गायकवाड, शेख इरफान यांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले आहे. सेलू पंचायत समितीचा हा तंत्रज्ञानाधारित प्रयत्न ग्रामीण भागातील प्रशासन लोकाभिमुख आणि पारदर्शक बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.
प्रथम हप्ता वितरण लाभार्थी : ९८७४
द्वितीय हप्ता वितरण लाभार्थी : २९९१
तृतीय हप्ता वितरण लाभार्थी : ०००
अंतिम हप्ता वितरण लाभार्थी : ०००