Parabhani: ग्रामीण भागात सलग १२ तास वीजपुरवठा खंडित; सहायक अभियंता निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:57 IST2025-08-02T18:57:13+5:302025-08-02T18:57:37+5:30
सेवाविनियमन २००५ अंतर्गत सहायक अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे.

Parabhani: ग्रामीण भागात सलग १२ तास वीजपुरवठा खंडित; सहायक अभियंता निलंबित
- मारोती जुंबडे
परभणी: ग्रामीण विभाग क्रमांक २ मध्ये कार्यरत सहायक अभियंता राहुल घोडके यांच्यावर वीजपुरवठ्यातील अक्षम्य दुर्लक्ष आणि वरिष्ठांच्या सूचना न पाळल्याचा आरोप करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई विभागाचे अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
घोडके यांच्या कार्यक्षेत्रातील रहाटी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्र अंतर्गत असलेल्या रहाटी फीडरवर ३० जुलै रोजी रात्री १०.५० वाजल्यापासून तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे समसापुर, पिंपरी (दे.), टाकळी (कु.), रहाटी आणि पिंगळी या गावांमध्ये संपूर्ण अंधार झाले. मात्र, संबंधित अभियंत्याने ना वीजपुरवठा खंडित होण्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, ना त्यांना दूरध्वनीवर प्रतिसाद दिला, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारणास्तव वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला तर कंपनीच्या कार्यक्षमतेविषयी नकारात्मक संदेशही पसरला. या दुर्लक्षमुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचल्याचे निर्देशांत नमूद आहे. सेवाविनियमन २००५ अंतर्गत राहुल घोडके यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे.
वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश वाघमारेही निलंबित
याचप्रमाणे, महावितरणच्या परभणी ग्रामीण शाखा क्रमांक २ मध्ये कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश वाघमारे यांनाही सेवा शिस्तभंग, जबाबदारीतील हलगर्जीपणा आणि वरिष्ठांचे निर्देश न पाळल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई उपकार्यकारी अभियंता महावितरण ग्रामीण उपविभाग गजेंद्र गादेकर यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. ३३ के.व्ही. उपकेंद्र रहाटी अंतर्गत असलेल्या रहाटी फीडरवर वीजपुरवठा तब्बल १२ तास खंडित राहिला, ज्यामुळे संबंधित गावांत संपूर्ण अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही वाघमारे यांनी ना ब्रेकडाऊनची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, ना दुरुस्तीचा तत्काळ प्रयत्न केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.